मुंबई : भारतीय क्रिकेटपटूची प्राथमिकता देशासाठी खेळणं आहे. यानंतरच एखाद्या क्रिकेटपटूला दुसरी स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली जाईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर रवींद्र जडेजा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळू शकणार नाही. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये जडेजाला उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी सौराष्ट्रच्या टीमने केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात ९ मार्चपासून रणजी ट्रॉफीच्या फायनलला सुरुवात होणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी गांगुलीशी चर्चा केली होती. जडेजाला फायनलसाठी खेळून द्यावं, अशी मागणी शाह यांनी गांगुली यांच्याकडे केली होती. पण देश पहिले येतो, त्यामुळे जडेजाला परवानगी देऊ शकत नाही, असं गांगुलीने सांगितल्याचं शाह म्हणाले.


रणजी ट्रॉफी फायनल सुरु झाल्यानंतर ३ दिवसांमध्येच भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा अजून झालेली नाही.


जयदेव शाह यांनी मात्र बीसीसीआयच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रेक्षक स्थानिक स्पर्धा बघण्यासाठी यावेत, असं बीसीसीआयला वाटत असेल, तर त्यांनी अशा मोठ्या मॅचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवू नये. बीसीसीआय आयपीएलवेळी आंतरराष्ट्रीय मॅच ठेवेल का? कारण आयपीएलमधून पैसे मिळतात, अशी टीका जयदेव शाह यांनी केली आहे.


जेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये दिग्गज खेळाडू खेळतील, तेव्हाच रणजी ट्रॉफी लोकप्रिय होईल. रणजी ट्रॉफी फायनलवेळी आंतरराष्ट्रीय मॅच ठेवू नये. जडेजा सौराष्ट्रकडून फायनलमध्ये खेळला असता, तर मला आनंद झाला असता. जडेजाच का मोहम्मद शमी बंगालकडून खेळला असता तरीही मला आनंद झाला असता, असं वक्तव्य जयदेव शाह यांनी केलं.