अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : भारताच्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तसेच साऊथ आफ्रिका क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन गॅरी कर्स्टन यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी भारतातील खेळाडूंना मिळणार आहे. गॅरी कर्स्टन यांच्या क्रिकेट अकादमीची देशातील पहिली शाखा लवकरच पुण्यात सुरु होणार आहे. स्वतः गॅरी यांनी याबाबतची माहिती दिलीय. तुमच्याकडे क्रिकेटचं कौशल्य असेल तर त्या कौशल्याला योग्य असा आकार देण्याचं काम गॅरी कर्स्टन इंडिया ही अकादमी करणार आहे. क्रिकेटची आवड असलेल्या खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम गॅरी कर्स्टन अकादमीकडून केलं जातं. लवकरच पुण्यातील कल्याणी नगरमध्ये गेरी कर्स्टन अकादमी सुरु होणार आहे.  विशेष म्हणजे गेरी कर्स्टन यांच्या साऊथ आफ्रिकेतील अकादमीमध्ये कार्यरत असलेले प्रशिक्षकच पुण्यातील अकादमीमध्ये रुजू होणार आहेत. त्यामध्ये स्वतः गॅरी कर्स्टन हेदेखील विशिष्ट प्रसंगी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. 


गॅरी कर्स्टन अकादमी टेलेन्ट असलेली मुलं शोधण्याचं काम पुढील काही दिवस करणार आहे. मुंबई, बंगलोर अशा विविध ठिकाणी ही टेलेन्ट हंट स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात निवड झालेल्या मुलांना अगदी सर्वसाधारण स्वरूपात शुल्क आकारून क्रिकेटचे धडे दिले जाणार आहेत.