कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सौरव गांगुलीला अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडण्यात आलं. गांगुलीबरोबरच इतर चार अधिकाऱ्यांची निवडही बिनविरोध होती. अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली असली तरी गांगुलीला जुलै २०२० पर्यंतच या पदावर कायम राहता येईल. यानंतर गांगुली 'कुलिंग ऑफ पिरेड'वर जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या आदेशानुसार सीएबी शनिवारी त्यांची सर्वसाधारण सभा घेणार आहे. सीएबीचे निवडणूक अधिकारी सुशांता रंजन उपाध्याय म्हणाले, या चौघांची त्यांच्या पदांवर बिनविरोध निवड झाली आहे.


४७ वर्षांचा सौरव गांगुली दुसऱ्यांदा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष बनला आहे. २०१५ साली जगमोहन दालमियांच्या निधनानंतर गांगुलीने पहिल्यांदा हे पद सांभाळलं होतं. २०२० साली गांगुलीचा ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल. यानंतर गांगुली कुलिंग ऑफ पिरेडवर जाईल. बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणताच पदाधिकारी लागोपाठ ६ वर्षापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही. जरी पदं वेगवेगळी असतील तरी हा नियम लागू आहे.


बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमियांचा मुलगा अभिषेक दालमिया आता सीएबीचे सचिव असतील, याआधी ते संयुक्त सचिव होते. देबब्रत दास यांना आता संयुक्त सचिव करण्यात आलं आहे. देबाशीष गांगुलीला कोषाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. सगळे अधिकारी शनिवारी होणाऱ्या बैठकीत पद स्वीकारतील.