मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan), कट्टर प्रतिस्पर्धी. दोन्ही संघातील सामना म्हणजे थरार, उत्सुकता, भिती, असं कम्पलिट पॅकेज. दोन्ही देशातील क्रिकेट चाहते हे या उभयसंघातील सामन्याची उत्सूकतेने वाट पाहत असतात. दोन्ही टीम सध्या आयसीसीच्या स्पर्धेतच एकत्र खेळतात. मात्र आता हे दोन्ही संघ तिरंगी मालिकेत खेळताना दिसू शकतात. एका बड्या अधिकाऱ्याने याबाबतचे संकेत दिले आहेत. (cricket australia chief executive nick hockley on tri series team india pakistan and australia)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे सर्वेसर्वा निक हॉकले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. हॉकले यांनी आज (बुधवार) टीम इंडिया, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिका (India-Pakistan-Australia Tri-Series)  आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.


निक हॉकले काय म्हणाले?
 
आम्ही भविष्यात टीम इंडिया-पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिकेचं आयोजन करण्यासाठी इच्छुक आहोत, असं हॅकले म्हणाले. टीम इंडिया-पाकिस्तान या दोन्ही संघात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. आता पु्न्हा जर हे दोन्ही टीम आमनेसामने भिडणार असतील, तर क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरेल.  


जानेवारी महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेयरमॅन रमीज राजा यांनी चौरंगी मालिकेबाबत मत व्यक्त केलं होतं. आम्ही पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या 4 संघात चौरंगी मालिकेच्या आयोजनासाठी इच्छूक असल्याचं राजा म्हणाले होते. 


आता ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेसाठी इच्छूक असल्याचं म्हटलंय. मात्र हॉकले यांनी क्रिकेट बोर्डाने याबाबत  कोणतीही चर्चा केली नसल्याचंही स्पष्ट केलं. मात्र आम्ही आयोजनासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.  


तिरंगी मालिका होणार?  


"वैयक्तिक पातळीवर मला तिरंगी मालिका आवडते. याआधीही क्रिकेट चाहत्यांनी तिरंगी मालिकेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आम्ही देखील अशाच मालिकेच्या आयोजनाच्या बाजूने आहोत. भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नागरिक हे ऑस्ट्रेलियात राहतात. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना जगातील प्रत्येत जण पाहण्यासाठी इच्छूक असतो", असं हॉकले म्हणाले.  


दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिरंगी मालिका होणं अवघडच वाटतंय. पुढील वर्षापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत फ्यूचर टूर प्रोग्राम (FTP) जाहीर झाला आहे. फ्यूचर टूर प्रोगाम म्हणजे कोणता संघ येत्या काही महिन्यांमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार याची माहिती.


टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबर 2022 मध्ये दोन हात करणार आहेत. दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला भिडणार आहेत.