Bengaluru Water Crisis Effect On IPL 2024 : आयपीएल 2024 सुरु होण्यास आता काहीच दिवसांचा अवधी राहिलाय. गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रोहित शर्माची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) पहिल्या लढतीत आमने सामने असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल व्यवस्थापनाने 17 दिवसांच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक (IPL Scheduled) जाहीर केलं आहे. यात एकूण 21 सामने खेळवले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची (Loksabha 2024) तारीख जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये एकही सामना होणार नाही?
रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचे सामने होम ग्राऊंडवर होणार की नाही याबात साशंकता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे बंगळुरुमधलं पाणी संकट (Water Crisis). बंगळुरुत सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेय. काही दिवसातच बंगळुरुमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. पण या सामन्यांवर पाणी टंचाईचं सावट पसरलंय. पाण्याची टंचाई पाहाता बंगळुरुमधले सामने इतरत्र खेळवण्याची मागणी होऊ लागली आहे. 


बंगळुरुत किती सामने
बंगळुरुत आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा पहिला सामना 25 मार्चला पंजाब किंग्सविरुद्ध, दुसरा सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर तिसरा सामना 2 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. यावर कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने स्पष्टीकरण दिलं आहे. बंगळुरुत खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या तीनही सामन्यांवर पाणी टंचाईचा परिणाम होणार नाही, कारण स्टेडिअमसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरलं जाणार आहे, असं कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने सांगितलंय. 


कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभेंदु घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरुत खेळवले जाणारे आयपीएलचे कोणतेही सामने रद्द होणार नाहीत. स्टेडिअमसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा साठा करुन ठेवण्यात आला आहे. तसंच राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करत असल्याचं म्हटलं आहे. 


बंगळुरुत तीव्र पाणी टंचाई
बंगळुरुत सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळाने नोटीस जारी केली असून यात बागेला पाणी किंवा कार धुण्यासाठी पाण्याचा वापराला बंदी घालण्यात आली आहे. स्विमिंग पूलमध्येही पाणी वापर करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचं उल्लंघन केल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पाणी टंचाईचा फायदा उचलत पाण्याच्या टँकर्स लॉबीने अतिरिक्त पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. 


1000 लीटर पाण्याच्या टँकरची किंमत 600 ते 800 रुपये इतकी होती. आता पाण्याच्या टँकरची किंमत 2000 रुपयांपंर्यंत पोहोचली आहे.