जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला
Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटीत युवा फलंदाज हॅरी ब्रूकने इतिहास रचला आहे. ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत तिहेरी शतक लगावलं. याबरोबरच त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मागे टाकलाय.
Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला गेलाय. इंग्लडच्या फलंदाजांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना त्यांच्याच देशात धुतलं. पहिल्या डावात इंग्लंडने सात विकेट गमावत तब्बल 823 धावांचा डोंगर उभा केला. यात जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोन फलंदाजांचं योगदान पाचशेहून अधिक धावांचं होतं. जो रुटने (Joe Root ) 262 धावांची खेळी केली. पण खरी कमाल केली ती हॅरी ब्रूकने (Harry Brook). त्याने तिहेरी शतक (Tripple Century) लगावत विक्रम रचला. तब्बल 34 वर्षांनी एखाद्या इंग्लिश फलंदाजाने तिहेरी शतक केलं आहे. हॅरी ब्रूकच्या आधी 1990 मध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ग्रॅहम गूचने 333 धावांची खेळी केली होती. आता 34 वर्षांनी ब्रूक इंग्लंडचा हा दुष्काळ संपवला आहे.
मुल्तानमध्ये वेगवान तिहेरी शतक
अवघ्या 310 चेंडूत तिहेरी शतक लगावत हॅरी ब्रूक मुल्तानचा सुल्तान बनला आहे. मुल्तानच्या मैदानावर वेगवान तिहेरी शतक रचण्याचा विक्रम ब्रूकच्या नावावर जमा झाला आहे. याआधी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाजी वीरेंद्र सेहवागने 364 चेंडूत तिहेरी शतक ठोकलं होतं. ब्रूकने मुल्तानच्या मैदानावर सेहवागचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला आहे. सेहवाने मुल्तानमध्ये 312 धावा केल्या होत्या. ब्रूकने 317 धावांची धमाकेदार खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेर शतकाचा विचार केला तर वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सेहवागन अवघ्या 278 चेंडूत तिहेरी शतक केलं होतं.
इंग्लंडच्या 6 फलंदांजांचं तिहेरी शतक
कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा हॅरी ब्रूक हा सहावा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. याआधी लेन ह्यूटन, वॅली हैमंड, ग्रॅहम गूच, एंडी सँढम, जॉन एडरिच या खेळाडूंनी तिहेरी शतकाचा विक्रम केला आहे. पण पाकिस्तानविरुद्ध तिहेरी शतक करणारा ब्रूक हा पहिला इंग्लिश खेळाडू आहे.
हॅरी ब्रूकचं तिहेरी शतक
- 49 चेंडूत 50 धावा
- 118 चेंडूत 100 धावा
- 186 चेंडूत 150 धावा
- 245 चेंडूत 200 धावा
- 281 चेंडूत 250 धावा
- 310 चेंडूत 300 धावा
- 322 चेंडूत 317 धावा
पाकिस्तानची दाणादाण
पहिल्या डावात पाकिस्तानने 556 धावा केल्या. पण दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांची दाणादाण उडाली आहे. अवघ्या 109 धावात पाकिस्तानने सहा विकेट गमावले असून घरच्या मैदानावर पराभवाची नामुष्की ओढावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.