11 दिवस, 11 मॅच, कोट्यवधींचं बक्षीस, नव्या टी20 क्रिकेट लीगची घोषणा... `या` तारखेला होणार सुरुवात
T20 League : इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान क्रिकेट लीग, बीग बॅश क्रिकेट लीग, कॅरेबिअन प्रीमिअर लीग, बांगलादेश क्रिकेट लीग अशा अनेक टी20 क्रिकेट लीग सध्या सुरु आहेत. यात आता आणखी एका क्रिकेट लीगची भर पडली आहे. पुढच्याच महिन्यात या क्रिकेटला लीगला सुरुवात होणार आहे.
T20 League : क्रिकेट जगतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल टी20 लीग प्रचंड यशस्वी ठरली. आयपीएलचं यश पाहता जगभरात आता अनेक क्रिकेट लीग (Cricket League) सुरु झाल्या आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाची स्वत:ची क्रिकेट लीग आहे. यात आता आणखी एका क्रिकेट लीगची भर पडली आहे. या क्रिकेट लीगचं नाव आहे ग्लोबल सुपर लीग (Global Super League). या लीगची सुरुवात 26 नोव्हेंबरपासून होणार असून 11 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी 8 कोटी रुपये प्राईज मनी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्लोबल सुपर लीगमध्ये केवळ पाच देशांचे संघ खेळतील.
26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान लीग
पाच देशांदरम्यान खेळवली जाणारी ग्लोबल सुपर लीगचं आयोजन वेस्ट इंडिजमधल्या गयाना इथं होणार आहे. 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असून या 11 दिवसात एकूण 11 सामने रंगतील. ग्लोबल सुपर लीगला क्रिकेट वेस्टइंडिजची मान्यता असून गयाना सरकारने सर्वोतपरी मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
कोणते संघ सहभागी होणार?
ग्लोबल सुपर लीगमध्ये कॅरेबिअन प्रीमिअर लीगमधली गयाना अमेझन वॉरियर्स हा एक संघ असणार आहे. याशिवाय चार संघ हे वेगवेगळ्या देशातील लीगशी संबंधीत असतील. ESPNcricinfo वर्तवलेल्या शक्यतेनुसार ग्लोबल सुपर लीगमध्ये हॅम्पशायर हा एक संघ असू शकतो. हॅम्पशायरने इंग्लंड टी20 ब्लास्ट लीगचं तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे.
ग्रुप स्टेजवर प्रत्येकी चार सामने
ग्लोबल सुपर लीगमध्ये 11 सामने होतील. यात सर्व संघ प्रत्येकी चार सामने खेळतील. पॉईंट टेबलमध्ये टॉपचे दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. लीगमधले सर्व सामने गयाना नॅशनल स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. मीडियाच्या रिपोर्टनुसार ग्लोबल सुपर लीगचं आयोजन दरवर्षी केलं जाईल. यात वेगवेगळ्या देशात खेळल्या जाणाऱ्या टी20 लीगमधली संघ असतील.
ग्लोबल सुपर लीगसमोर आव्हान
ग्लोबल सुपर लीगची घोषणा करण्यात आली असली तरी या लीगसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते अबू धाबी टी10 लीगचं. ज्यावेळी ग्लोबल सुपर लीग खेळवली जाणार आहे, त्याच दरम्यान आबू धाबी टी10 लीग रंगणार आहे. 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंती टी10 लीग खेळवली जाणार आहे. याशिवाय बांगलादेशचा वेस्ट इंडिज दौराही याच दरम्यान आहे. 22 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान बांगलादेश आणि वेस्ट इंडिजदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.