ICC ODI Batters Rankings :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा नंबर वन फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने युवा स्टार फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) मागे टाकलंय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसुद्धा रोहित शर्मापेक्षा मागे आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) शुभमन गिलला मागे टाकत हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर शुभम गिल तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान
रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचताच बाबर आझमला आव्हान दिलं आहे. याआधी रोहित शर्मा तिसऱ्या क्रमाकांवर होता, नव्या क्रमवारीत रोहित शर्माने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या क्रमाकांवर असणाऱ्या बाबर आझमच्या खात्यात 824 पॉईंट आहेत. रोहित शर्मा त्याच्यापेक्षा केवळ 59 पॉईंटने मागे आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. 


रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात
आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर थेट आठ महिन्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी मैदानात उतरला. पण तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. पण रोहित शर्माने या मालिकेत चांगली कामगिरी केली. 37 वर्षांच्या रोहितने 141.44 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा केल्या. यात रोहितने दोन अर्धशतकं केली. रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 64 इतकी होती. 


चौथ्या क्रमांकावर विराट
रोहित शर्माप्रमाणेच विराट कोहलीसुद्धा एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर थेट श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसला. पण त्याची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. तीन सामन्यात विराट कोहलीने केवळ 58 धावा केल्या. युवा स्टार फलंदाज शुभन गिलसुद्धा स्ट्रगल करताना दिसला. तर श्रीलंकेचा युवा फलंदाज अविष्का फर्नांडोने 20 स्थानांची झेप घेत थेट 68 वा क्रमांक गाठला आहे. विशेष म्हणजे आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर 746 पॉईंटसह टॉप पाचमध्ये पोहोचला आहे. 


कुलदीप यादव नंबर वन गोलंदाज
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव अव्वल स्थानावर आहे. याशिवाय केशव महाराज, जोश हेजलवूड आणि अॅडम झम्पा हे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चार विकेट घेतल्या. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आठव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराजला पाच स्थानांचा फटाक बसलाय, सिराज दहाव्या क्रमांकावर आहे.