ICC Rankings : बांगलादेशविरुद्धच्या दमदार मालिका विजयानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला (India vs New Zealand 1st Test) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. याचा मोठा फटका भारतीय दिग्गज फलंदाजांना बसला आहे. भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) आयसीसी कसोटी क्रमावरीत घसरण झाली आहे. तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत आणि सर्फराज खानने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-रोहितची घसरण
विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शुन्यावर बाद व्हावं लागलं होतं.पण दुसऱ्या डावात विराटने 70 धावांची खेळी केली. त्यामुळे क्रमवारीत टॉपमध्ये विराटचं एका स्थानाने नुकसान झालं आहे. विराट कोहली आठव्या क्रमांकावर घसरला आहे. तर न्यूझीलंडबरोबरच बांगलादेश कसोटी सामन्यातही रोहित शर्माला मोठी खेळी करता आलेली नव्हती. याचा फटका त्याला क्रमवारीत बसला आहे. रोहितची दोन स्थानांची घसरण झाली असून रोहित आता 16 व्या स्थानावर गेलाय. 


पंतची मोठी झेप
टीम इंडियाचे युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने मात्र टॉप 10 मध्ये आपली जागा कायम ठेवली आहे. यशस्वी जयस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटीत 99 धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. पंत सहव्या क्रमांकावर पोहोचलाय. 


आयसीसी क्रमवारीत इंग्लंडचा दमदार फलंदाज जो रुटने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. तर न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि डेवोन कॉनवेनही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन दुसऱ्या तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


कसोटी क्रिकेटमध्ये ऑलराऊंडरच्या यादीत टीम इंडियाच्या रवींद्र जडेजाने आपलं  स्थान कायम ठेवलं आहे. तर आर अश्विन 335 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


गोलंदांजांच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा दबदबा कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात बुमराहने दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. तर दुसरं स्थानही भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपल्याकडे कायम ठेवलं आहे. टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो सोळाव्या स्थानावर आहे.