IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
IND vs AUS 2nd Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India-Australia 2nd Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतला (Border-Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Delhi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय स्पीन गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाच्या (R Jadeja) फिरकीच्या जाळ्यात पुन्हा कांगारु अडकले.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं
कसोटी सामन्याची सुरुवात 1877 साली झाली. पण या दिल्ली कसोटी सामन्यात (Delhi Test) एक अशी गोष्ट घडली जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात याआधी कधीच घडली नव्हती. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक इनिंग आणि 132 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारतीय स्पिनर्सच्या जाळ्यात कांगारु पुरते फसले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दुसऱ्या सामन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ केवळ एक वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला आहे. हा वेगवान गोलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स.
146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघ केवळ 1 वेगवान गोलंदाजासह सामना खेळतोय. ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत तब्बल 4 स्पिनर्सना संधी दिली आहे. नॅथन लियोन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नमॅन (Matthew Kuhnemann) आणि ट्र्र्र्रॅव्हिस हेड अशा चार स्पिनर्स मैदानात उतरणार आहेत. मॅथ्यू कुह्नमॅनला मिचेल स्वेपसनच्या (Mitchell Swepson) जागी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालं आहे.
भारतीय संघातही तीन स्पीन गोलंदाज
भारतीय क्रिकेट संघातही अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत आर अश्विन (Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांना संधी देण्यात आली आहे, तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हे सांभाळत आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी, पॅट कमिंस (कर्णधाकर), टॉड मर्फी, नॅथन लियोन, मॅथ्यू कुह्नमॅन.
टीम इंडिया प्लेइंग 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.