India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यासाठी अहमदाबादच्या मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) लाखो क्रिकेट चाहत्यांनी हजेरी लावली होती. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. पहिली फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांवर गारद झाला तर विजयाचे हे सोप आव्हान टीम इंडियाने 30 षटकात अवघ्या तीन विकेटच्या मोबदल्यात पार केलं. विश्वचषकातील या सामन्याच्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान संघांदरम्यानचा महामुकाबला पाहता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईत स्पर्धेचं आयोजन
8 डिसेंबरपासून आठ संघांकमध्ये अंडर-19 एशिया कप स्पर्धेला (Under 19 Asia Cup) सुरुवात होणार आहे. 17 डिसेंबरला या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येकी चार संघांचे दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, जपान, श्रीलंका आणि यजमान यूएई संघाचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर असलेले दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सेमीफायनलचे सामने 15 डिसेंबरला खेळवले जाणार आहेत. 


भारत-पाक महामुकाबला
सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरु होईल. भारताची सलामीची लढत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. तर दहा डिसेंबरला भारत आणि पाकिस्तानदरम्यान महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताचा तिसरा सामना 12 डिसेंबरला नेपाळविरुद्ध रंगेल. भारताचे सर्व सामने दुबईच्या आयसीसी अकॅडमी ग्राऊंडवर खेळवले जाणार आहेत. कोणत्याही स्पोर्ट्स चॅनेरवर या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार नाहीए. ACC चं युट्यूब चॅनेल आणि Asian Cricket Council TV वर या सामने मोफत दिसतील. 


भारत 8 वेळा चॅम्पियन
अंडर-19 एशिया कप स्पर्धेचा भारत हा गतविजेता संघ आहे. 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. अंडर-19 एशिया कप स्पर्धा तब्बल 8 वेळा जिंकण्याचा टीम इंडियाच्या नावावर विक्रम आहे. या स्पर्धेने यश धुल, राज बावा, राजवर्धन हंगेरकर असे अनेख खेळाडू दिले आहेत जे आता आयपीएलमध्ये चमकतायत. 1989 मध्ये भारताने पहिल्यांदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पाकिस्तान एकवेळा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. 


अंडर-19 एशिया कपसाठी भारतीय संघ 
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौड़ा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.