IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार, दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?
IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने येणार आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) तिकिटेही पणाला लागली आहेत. शिवाय कर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. या परीक्षेची सुरुवात प्लेईंग इलेव्हनने (Playing 11) होणार आहे.
कशी असणार प्लेईंग XI
सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 8 फेब्रुवारीला दोन्ही संघांच्या कर्णधारांचा पत्रकार परिषद झाली. पण यात त्यांनी अंतिम अकरा खेळाडूंबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नाही. पण टीम इंडियाबद्दल (Team India) विचार करायचा झाला, तर कसोटी मालिका भारतात होणार असल्याने स्पीन गोलंदाजांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चार स्पिनरला घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा अनुभवी स्पीन गोलंदाज आर अश्विनच्या (R Ashwin) जोडीला, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाज म्हणूनही आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल उपयोग ठरु शकतात.
याशिवाय वेगवान गोलंदाजीबद्दल विचार केला तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचं खेळणं जवळपास नक्की आहे. तर घरचं मैदान असूनही उमेश यादवला (Umesh Yadav) या सामन्यात बाहेरच बसावं लागण्याची शक्यता आहे.
राहुल-सूर्या इन, गिल आउट
टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते फलंदाजीचं. संघात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचं स्थान निश्चित आहे. पण उरलेल्या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या दाव्यानुसार केएल राहुलला (KL Rahul) वगळून सध्या फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) सलामीला पाठवणं योग्य ठरेल. विशेष म्हणजे मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. टी20 क्रिकेटचा शिक्का बसलेल्या सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे.
काही क्रिकेट तज्ज्ञांच्या दाव्यानुसार केएल राहुलला संधी मिळू शकते. असं झालं तर शुभमन आणि सूर्यकुमार यादव या दोघांपैकी एकाला अंतिम अकरात स्थान मिळेल. यात सध्या तरी सूर्यकुमार यादवचं पारड जड दिसतंय. विकेटकिपिंगसाठी ईशान किशनऐवजी केएस भरतला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. असं झालं तर नागपूर कसोटीत टीम इंडियाकडून दोन खेळाडू कसोटीत पदार्पण करतील.
ऑस्ट्रेलियासमोर अंतिम अकराचा प्रश्न
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासमोरही अंतिम अकरा खेळाडूंच्या निवडीचा मोठा प्रश्न आहे. संघाची फलंदाजी मजबूत आहे. पण गोलंदाजीत काही बदल होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि कॅमरुन ग्रीन पहिल्या कसोटीत खेळणार नाहीत. अशात कर्णधार पॅट कमिन्सबरोबर स्कॉट बोलँडला संधी मिळू शकते. स्पीन गोलंदाजामध्ये नॅथन लायनला टॉड मर्फी आणि मिचेल स्वेपएनची साथ मिळेल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज