`माझी हत्या झाल्यास राष्ट्रपती जबाबदार` म्हणणाऱ्या मंत्र्यांची उचलबांगडी; क्रिकेटमुळे राडा
Sports Minister Sacked By President: मागील अनेक आठवड्यांपासून क्रिकेट बोर्ड नको त्या कारणांमुळेच चर्चेत असतानाच आता थेट राष्ट्राध्यक्षांनी आपल्या हत्येचा कट केल्याचा आरोप क्रिडामंत्र्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
Sports Minister Sacked By President: अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाविरोधात कारवाई केल्यानंतर श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी देशाच्या खेळमंत्र्यांची उचलबांगडी केली आहे. या निर्णयामुळे क्रिडामंत्री रोशन रणसिंघे यांच्यावरुन पदावरुन बाजूला होण्याची नामुष्की ओढावली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांनी रणसिंघेंना 28 नोव्हेंबर रोजी तात्काळ प्रभावाने देशाच्या क्रिडा मंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे. या खळबळजनक आणि तडकाफडकी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे श्रीलंकेमधील राजकारणामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून क्रिकेट चाहत्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप केले पण...
रणसिंघे यांनी श्रीलंकन क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलं. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यापर्यंत रणसिंघेंनी क्रिकेटमध्ये हस्तक्षेप केला. या महिन्याच्या सुरुवातीला निवडून आलेलं क्रिकेट बोर्ड बरखात्स करण्याचा निर्णय रणसिंघेंनी घेतला. पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचा दावा क्रिडामंत्र्यांनी केला. मात्र या पदाधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्या या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
आता कारभार कोणाकडे?
रणसिंघेंना पदावरुन काढून टाकल्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा कारभार आता तात्पुरत्या स्वरुपात अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे सोपवण्यात आला आहे. मात्र रणतुंगा यांची नियुक्ती केल्याने श्रीलंकेतील क्रिकेट वर्तुळाबरोबरच सर्वात मोठी क्रिकेट नियामक संस्था असलेल्या आय़सीसीमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. आयसीसीच्या बोर्टाची बैठक 21 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये श्रीलंकने क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई करण्याचा 10 नोव्हेंबरचा निर्णय जैसे थे ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रपती आपली हत्या करण्याची शक्यता केलेली व्यक्त
क्रिकेट बोर्डातील भ्रष्टाचार संपवण्याचा आपला प्रयत्न असून याला विरोध करण्यासाठी राष्ट्रपती आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप रणसिंघेंनी केला होता. "क्रिकेट बोर्डातील साफसफाई मी हाती घेतल्याने माझी हत्या होऊ शकते अशी मला भीती आहे. माझी रस्त्यात हत्या झाली तर त्यासाठी राष्ट्रपती आणि त्यांचे चीफ ऑफ स्टाफ जबाबदार असतील," असं रणसिंघे म्हणाले होते. त्यानंतरच मंत्रीमंडळाने रणसिंघेंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रणसिंघेंनी केलेल्या या आरोपामुळे यापूर्वीही विक्रमसिंघेवर क्रिकेट बोर्डावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केले असल्याचे आरोप चर्चेत आले आहेत.
जगभरात नाव खराब
क्रिकेटसंदर्भातील निर्णयांमध्ये राजकीय हस्ताक्षेप वाढल्याचा ठपका ठेवत आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता क्रिडामंत्र्यांच्या निलंबनानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही तातडीने त्यांच्यावरील बंदी आयसीसीकडून उठवली जाण्याची शक्यता कमीच आहे. वर्ल्ड कपमधील खराब प्रदर्शनानंतर आयसीसीने केलेल्या निलंबनामुळे जगभरात श्रीलंकन क्रिकेटचं नाव खराब झालं आहे. वर्ल्ड कपमधील श्रीलंकेच्या सुमार कामगिरी आणि सातत्याने झालेल्या पराभवामुळे दोषारोप करत क्रिकेट बोर्डामधील वाद चव्हाट्यावर आल्याने त्याचा हा परिणाम असल्याचीही चर्चा श्रीलंकेत आहे.