घर चालवण्यासाठी टॅक्सी चालवायचा, आता ऑस्ट्रेलियाला दिला दणका... पाकिस्तानला मिळाला वेगाचा नवा बादशहा
PAK vs AUS Perth Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिका खेळवली जातेय. या मालिकेतील पहिली कोसटी पर्थमध्ये खेळली जात असून पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूने संपर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. पदार्पणातच या खेळाडूने ऑस्ट्रेलियाला दणका दिलाय.
Aamer Jamal Struggle: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (Pakistan vs Australia) पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या एका युवा वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची धुळदाण उडली. या खेळाडूने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाकिस्तानच्या या नव्या सुपरस्टारचं नाव आहे आमेर जमाल (Aamer Jamal). आमेरने पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे आमेर जमालने या सामन्यात आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. पहिल्याच कसोटी सामन्यात आमेर जमालने केलेल्या या कामगिरीचं कौतुक होतंय.
आमेर जमालचा जलवा
पर्थ कसोटी सामन्यात आमेर जमालने आपल्या कामगिरीने छाप उमटवली आहे. 27 वर्षांच्या या वेगवान गोलंदाजाने डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेव्हिस हेड सारख्या ऑस्ट्रेलिच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. आमेरने 20 षटकात 111 धावा देत तब्बल सहा विकेट घेतल्या. सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल होत असून क्रिकेट चाहत्यांनाही त्याची गोलंदाजी चांगलीच पसंतीस पडली आहे. आमेर जमालचं आणखी एक कारणासाठी कौतुक होतंय, ते म्हणजे काही महिन्यांपूर्वीच तो घर खर्च चालवण्यासाठी पाकिस्तानमध्ये टॅक्सी चालकाचं काम करायचा.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आमेरच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आमेरच्या संघर्षपूर्ण जीवणाची झलक दाखवण्यात आली आहे. शालेय जीवनापासून त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने क्रिकेटच्या महागड्या वस्तू घेण परवत नव्हतं, त्यामुळे त्याने घरखर्च आणि क्रिकेटची आवड पूर्ण करण्यासाटी टॅक्सी चालवली.
पाकिस्तानच्या अंडर-19 संघात संधी
शिक्षणात उत्तम असल्याने परीक्षेआधी थोडाफार अभ्यास करत शाळेत चांगले मार्क मिळत होतो असं आमेरने या मुलाखतीत सांगितलं. पण त्याला क्रिकेटरच व्हायचं असल्याने शिक्षणावर त्याने जास्त लक्ष दिलं नाही. शाळेत असतानाच तो क्रिकेट खेळायला जायचा. त्याला पहिली मोठी संधी मिळाली ती म्हणजे पाकिस्तानच्या अंडर-19 संघात. पण पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे काही काळ तो ऑस्ट्रेलियात क्लब क्रिकेटही खेळला. पण आपल्या देशाची ओढ त्याला स्वस्त बसू देईना म्हणून पुन्हा तो मायदेशी म्हणजे पाकिस्तानात परतला. त्यानंतर त्याने पाकिस्तान संघात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
घरातला मोठा मुलगा असल्याने पैसे कमवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होतो. त्यामुळे आमेर सकाळी क्रिकेटचा सराव आणि रात्री ट्रक्सी चालवायचा. पाकिस्तान क्रिकेट संघात संधी मिळणं ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असल्याचं त्याने सांगितलं. संघासाठी दमदार कामगिरी करण्याची त्याची इच्छ आहे. विशेष म्हणजे गोलंदाजीबरोबरच तो चांगली फलंदाजीही करतो. त्यामुळे आमेर जमालच्या रुपाने पाकिस्तानला एक नवा ऑलराऊंडर सापडला आहे.