Ind vs Eng 2nd Test : भारत आणि इंग्लडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 28 धावांनी मात करत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित (Rohit Sharma) शर्माचा प्रयत्न असेल. दुसऱ्या कसोटीत टॉस जिंकून रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करुन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर युवा शुभमन गिल (Shubhaman Gill) फलंदाजीसाठी आला. गेल्या काही सामन्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या गिलकडून या सामन्यात चांगल्या खेळी अपेक्षा चाहते व्यक्त करत होते. पण विशाखापट्टणम कसोटीतही शुभमन गिलने चाहत्यांची निराशा केली. 34 धावा करुन तो बाद झाला. त्यामुळे त्याच्या निवडीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिल सातत्याने अपयशी
शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये गेल्य काही काळापासून सातत्याने अपयशी ठरत आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिलने शेवटचं शतक लगावलं होतं. त्यानंतर एकाही डावात गिलला मोठी खेळी करता आलेली नाही. अशात निवड समिती शुभमन गिलला वारंवार संधी का देतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. हैदराबादची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी होती. त्यामुळे या खेळपट्टीवर काही अपवाद वगळता सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. पण विशाखापट्टनमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. या खेळपट्टीवरही शुभमनला चांगली खेळी करता आलेली नाही. 


चांगल्या सुरुवातीनंतर शुभमनने आपली विकेट फेकली. कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. कसोटी सामन्यात शुभमन सलामीला बॅटिंग करत होता. पण आता रोहित शर्माच्या जोडीला यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आलीय. यशस्वी जयस्वालने या जागेवर दमदार कामगिरी केलीय. त्यामुळे गिलसाठी तिसऱ्या क्रमांकावर जागा बनवण्यात आली. पण या जागेवरही तो धावा करु शकत नाहीए. 


गेल्या बारा सामन्यातील आकडेवारी
जुलै 2023 मध्ये गिल पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये नंबर तीनवर फलंदाजीला आला. या क्रमांकावर खेळताना गिलने 47, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, 0, 34 धावा केल्या. मार्च 2023 मध्ये गिलने अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 128 धावा केल्या होत्या. ही कसोटीतील त्याची एकमेव चांगली कामगिरी ठरलीय. 


सर्फराजला संधी का नाही?
कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतरही शुभमन गिलला संघात संधी मिळतेय. तर युवा सर्फराज खानकडे (Sarfaraz Khan) मात्र स्क्वॉडमध्ये घेऊनही दुर्लक्ष केलं जातंय. सर्फराजने स्थानिक आणि इंडिया एसाठी जबरदस्त कामगिरी केलीय. स्थानिक क्रिकेटमध्ये सर्फराजने 45 सामन्यात 3912 धावा केल्या आहेत. यात तब्बल 14 शतकांचा समावेश आहे. यानंतरही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. यावेळी चाहत्यांनी निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.