Ishan Kishan अखेर `या` ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?
Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Ishan Kishan in Team India : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ईशार किशन (Ishan Kishan) सध्या टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये ईशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची टी20 मालिका खेळला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही (BCCI) ईशान किशनच्या प्लानबाबत कोणीतीह कल्पना नव्हती. आता तब्बल दोन महिन्यांनी ईशान किशन सापडला आहे. ईशान किशन सध्या बडोद्यात किरण मोरे अकॅडमीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याबरोबर सराव करतोय. हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार आहे. ईशान किशनही मुंबई इंडियन्समधून खेळतो.
ईशानने स्वत:च घेतला ब्रेक
ईशान किशन आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण याबाबत त्याने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय टीम मॅनेजमेंट आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही ईशान किशनबाबतीत कोणतीही माहिती नाही. एका पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ईशान किशनविषयी विचारलं असता त्यांनी ईशाने स्वत:च क्रिकेटमधून ब्रेक घेतल्याचं सांगितलं. टीम इंडियात कधी पुनरागमन करेल याचा निर्णयही तोच घेईल असं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं. टीम इंडियात पुनरागमन करण्याधी ईशान किशन स्थानिक क्रिकेटमध्ये खेळेल.
रणजी ट्रॉफीतूनही बाहेर
सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. यातही ईशान किशन खेळला नाही. ईशान झारखंड संघाचं प्रतिनिधित्व करतो. अशात झारखंड क्रिकेट असोसिएशननेही ईशान किशनच्या प्लानबाबत कोणतीच माहिती नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. यादरम्यान ईशान किशन बडोद्यात सराव करताना दिसला. बीसीसीआय किंवा झारखंड क्रिकेट असोसिएशनला याबाबत त्याने कोणतीच माहिती दिलेली नाही. त्याच्या वागणूकीवर बीसीसीआय नाराज असल्याचं कळतंय.
बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार?
बीसीसीआयच्या नाराजीचा फटका ईशान किशनला बसू शकतो. ईशान किशनचा बीसीसीआयबरोबरच सेंट्रल कॉन्ट्रॅक रद्द होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. कारण मोठ्या काळापासून ईशान किशन टीम इंडियातून बाहेर आहे. तसंच तो स्थानिक क्रिकेटही खेळत नाहीए. ईशान किशन बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या C कॅटेगरीत येतो. सी कॅटेगरीतल्या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात.
ईशान किशनची क्रिकेट कारकिर्द
ईशान किशन टीम इंडियासाठी आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 913 धाव केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. तर 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 796 धावा केल्या आहेत. ईशान भारतासाठी 2 कसोटी सामनेही खेळलाय. यात त्याने 78 धावा केल्या आहेत.