India vs New Zealand Test Rohit Sharma : पहिल्या कसोटीप्रमाणेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची (Team India) दारुण अवस्था झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज किवींच्या गोलंदाजीसमोर सपशेल फ्लॉप ठरलेत. विशेषत: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सातत्याने अपयशी ठरतायत. संघाला गरज असताना हे अनुभवी फलंदाज झटपट बाद होतायत. बंगळुरु कसोटीनंतर पुणे कसोटीतही याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा ठरतोय फ्लॉप
पुणे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विजयाचं लक्ष समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीने 34 चेंडूत 34 धावा केल्या. पण यात यशस्वी जयस्वालच्याच धावा जास्त होत्या. यशस्वी दमदार फटकेबाजी करत होता, तर दुसरीकडे रोहितच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. अखेर व्हायचं तेच झालं. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा विकेट टाकून पॅव्हेलिअनमध्ये परतला. मिचेल सँटनरने रोहितला विल यंगच्या हातात झेल देण्यात भाग पाडालं. रोहितला केवळ 8 धावा करता आल्या. 


8 डावात 7 वेळा लवकर बाद
रोहित लवकर बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 8 डावात तब्बल 7 वेळा रोहित झटपट बाद झाला आहे. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहितने 5 आणि 6 धावा केल्या होत्या. कानपूर कसोटीत पहिल्या डावात 23 तर दुसऱ्या डावात 8 धावा केल्या. याचीच पुनरावृत्ती न्यूझीलंड कसोटीतही पाहायला मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित अवघ्या 2 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात रोहितला सूर गवसला आणि त्याने 52 धावा केल्या. 


पण पुणे कसोटी सामन्यात संघाला गरज असताना रोहितने पुन्हा नांगी टाकली. पहिल्या कसोटीत रोहितला भोपळाही फोडता आला नाही तर दुसऱ्या डावात 8 धावा करुन बाद झाला. 


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातआधी चिंता वाढली
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पण त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला सूर गवसणं गरजेचं आहे. अन्यथा रोहितचा आऊट ऑफ फॉर्म संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.