Ind vs Ban Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईत पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीवर टीम इंडियाने (Team India) मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवसावरही भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) मोठी धावसंख्या करण्याआधीच पॅव्हेलिअनमध्ये परतले. पण दुसऱ्या डावात विराट कोहलीने एक मोठी चूक केली. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई कसोटीत विराट फ्लॉप


मोठ्या ब्रेकनंतर कसोटी क्रिकेटसाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीला चेन्नई कसोटीत मोठी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या डावात विराट अवघ्या सहा धावांवर बाद झाला. तर दुसऱ्या डावातही अवघ्या 17 धावाकरुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण स्वत:च्याच चुकीमुळे विराटला पॅव्हेलिअनमध्ये परतावं लागलं. विराटने या सामन्यात मोठी चूक केली ज्याचा फटका त्याला बसला. अनुभवी विराटकडू अशी चूक झाल्याने कर्धार रोहित शर्माबरोबरच इतर खेळाडूही आश्चर्यचकित झालेत.


विराटने केली मोठी चूक


दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या विराटने 37 चेंडूत 17 धावा केल्या. चांगल्या लयीत येत असतानाच विराटने आपली विकेट टाकली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मेहदी हसनच्या गोलंदाजीवर विराट कोहली एलबीडब्ल्यू झाला. पण हैराण करणारी गोष्ट म्हणजे विराट कोहली एलबीडब्ल्यू नव्हता. पण यानंतरही विराटने DRS घेतला नाही. विराटच्या विकेटनंतर दाखवण्यात आलेल्या रिप्लेत विराट कोहली बाद नसल्याचं स्पष्ट दिसत होतं.


विराटने घेतला नाही डीआरएस


विराट कोहलीच्या बॅटला चेंडू लागून त्याच्या पॅडवर आदळला. मेहदी हसनने जोरदार अपील केलं तर अंपायरनेही मेहदी हसनचं अपील मान्य करत विराटला बाद दिलं. अंपायरने बाद दिल्यानंतर विराटने नॉन स्ट्राईकवर असलेल्या शुभमन गिलशी चर्चा केली. पण त्याने डीआरएससाठी अपीलच केलं नाही. DRS न घेताच तो पॅव्हेलिअनमध्ये परतला. विराट कोहली पॅव्हेलिअनमध्ये परतत असताना दाखवण्यात आलेल्या रिप्लेत चेंडू बॅटची कट घेऊन पॅडवर आदळल्याचं स्पष्ट दिसत होतं. रिप्ले पाहिल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये बसलेला कर्णधार रोहित शर्माही चांगलाच संतापलेला दिसला.


असा होता दुसऱ्या दिवसाचा खेळ


पहिल्या डावात टीम इंडियाने 376 धावा केल्या. याला उत्तर देताना बांगलादेशचा संघ अवघ्या 149 धावांवर गारद झाला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आकाश दीपने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 3 विकेट गमावत 81 धावा केल्या.