World Cup 2019 : विराटच्या दुखापतीमुळे टीम इंडिया धास्तावली
ऐन मोक्याच्याच वेळी.....
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झालेली असतानाच भारतीय क्रिकेट संघातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ही खरंतर धोक्याची सूचना असल्याचंही म्हचलं जात आहे. कारण, संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. Ageas Bowl रविवारी साऊथहँपटन येथे त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
विराट सरावामध्ये नेमकी फलंदाजी करत होता, की क्षेत्ररक्षण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तो पॅट्रिक फरहात या फिजिओसोबत दिसत आहे, ज्यामध्ये ते त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर स्प्रे मारताना दिसत आहेत. हातावर स्प्रे मारला जात असताना विराटला होणाऱ्या वेदना काही लपून राहिल्या नव्हत्या. त्यानंतरही तो बर्फाच्या सहाय्याने त्या अंगठ्याचं दुखणं कमी कमी करतानाचा प्रयत्न करताना दिसला.
'कॅप्टन कोहली'ची ही दुखापत आणि अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पाहता आता संघही चांगलाच धास्तावला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विराट विश्वचषकाच्या तयारीत व्यग्र होता. सरावापासून ते संघालाही या सामन्यांसाठी एकसंध ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या विराटला झालेली ही दुखापत क्रीडा रसिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण करुन गेली आहे.
बुधवारी म्हणजेच ५ जूनला भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोधात क्रिकेटच्या मैदानावर उभा ठाकणार आहे. या संघाचा फॉर्म पाहता हे आव्हान पेलण्यासाठी विराटची उपस्थिती तितकीच महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे आता ऐन मोक्याच्या वेळी संघात काही फेरबदल होणार की विराट दुखापतीवर मात करुन मैदानात उभा राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.