क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपसाठी खूशखबर
गांधीनगर : क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नीने राजकारणात प्रवेश केला आहे. याआधी रिवाबाची राजपूत संघटना असलेल्या करणी सेनेची गुजरात महिला प्रदेशाध्यक्ष होती. पण आगामी लोकसभेच्या तोंडावर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. Loksabha Election 2019 च्या आधी भाजपसाठी ही चांगली बातमी आहे. रिवाबा जडेजाने जामनगर येथे गुजरातचे कृषीमंत्री आरसी फालडू आणि खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) ला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. युवावर्गाला पक्षात आणण्यासाठी यामुळे मदत होईल असं नेत्यांना वाटतं.
भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने २०१६ मध्ये रिवाबासोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगी देखील आहे. रविंद्र जडेजाची बहिण देखील राजकारणात आहे. बन नैनाबा जडेजाने नॅशनल वुमन्स पक्षात प्रवेश केला आहे. नॅशनल वुमन्स पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानची जबाबदारी नैनाबा जडेजाला दिली आहे. रविंद्र जडेजाला २ मोठ्या बहिणी आहेत.
मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षातून आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पाण्डेय यांच्या उपस्थितीत अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बसपाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री मुकुल उपाध्याय (हाथरस), माजी राज्यमंत्री रामहेत भारती (सीतापूर), बसपाचे झोनल कॉआर्डिनेटर ध्रुव पाराशर, सपाचे माजी आमदार राज्यमंत्री बीना भारद्वाज (रामपूर), अखिल भारतीय आंगनवाडी कर्मचारी महासंघच्या अध्यक्षा सावित्री चौधरी (बुलंदशहर) आणि सामाजिक कार्यकर्ता शोमिल शर्मा (कानपूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.