क्रिकेट जगतातील धक्कादायक बातमी, शिखर धवनचं पत्नी आयेशाबरोबरचं 9 वर्षांचं नातं संपुष्टात?
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जीने 2012 मध्ये लग्न केलं, त्यांना एक मुलगाही आहे
मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनच्या (Shikhar Dhavan) वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Aesha Mukerji) यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे . आयेशाने याबाबत इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, शिखर धवनने मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
लग्नाला झाली नऊ वर्ष
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचं 2012 मध्ये लग्न झालं. त्यांच्या लग्नाला 9 वर्ष झाली. जेव्हा धवन आणि आयशाचे लग्न झाले तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण धवनच्या आईने त्याला साथ दिली. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीपासून आयेशाला दोन मुली आहेत. आलिया आणि रिया अशी त्यांची नावं आहेत. तर शिखर आणि आयेशाला एक मुलगा असून जोरावर असं त्याचं नाव आहे.
आयेशा गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहाते, त्यामुळे शिखर वेळ मिळेल तेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचा किंवा आयेशा भारतात यायची.
वर्षभरापासून नात्यात दूरावा
2020 पासूनच त्यांच्या नात्यात दूरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. यासोबतच आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. इतकंच नाही तर क्रिकेट सीरिजसाठी जेव्हा शिखर धवन ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा तो आयेशाच्या घरी न जाता थेट भारतात परतला होता.
शिखर आणि आयेशाची फेसबुकवर ओळख
शिखर धवन आणि आयेशा यांची फेसबुवर ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयेशा अनेकदा भारतीय सामन्यांच्यावेळी स्टेडिअमध्ये हजेरी लावायची.