नवी मुंबई : १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. देशाभरामध्ये या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. सामन्य माणसांपासून ते विविध क्षेत्रातील व्यक्ती या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत आहे. या सर्व प्रकरणाबाबत भारताचे माजी कर्णधार कपील देव यांना प्रश्न विचारला असता, ते उत्तर न देता निघून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी (१६ फेब्रुवारीला) कपील देव नवी मुंबईत मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कपील देव उत्तर न देता निघून गेले. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात भारताच्या विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांना साहाय्य करणार असल्याचे म्हटले आहे.


सेहवागची शहीदांच्या मुलांसाठी 'धाव'


सेहवाग पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे. याबबतची माहिती सेहवागने ट्विट करुन दिली आहे. सेहवाग ट्विटर म्हणाला की, 'जवानांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. शहीद जवानांसाठी आपण जितके करु तितके कमीच आहे. शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर आपण घेऊ शकतो. शहिद झालेल्या जवानांच्या मुलांनी माझ्या शाळेत प्रेवश घेतला तर ते माझ्यासाठी सौभाग्याचे ठरेल.' सेहवागचं सेहवाग इंटरनॅशनल स्कूल आहे.


शहीदांच्या शंभर मुलांना मदत करणार गौतम गंभीर


एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान गौतम गंभीरने आपल्याल सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरुनच त्याचे देशाप्रती आणि सैन्यदलाप्रती असलेल प्रेम दिसून येते. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या १०० मुलांना मदत करणार असल्याचे, गंभीरने सांगितले आहे. याआधी देखील गौतमने ५० मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे.


बीसीसीआयचीही मदत


शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीला देशातली सगळ्यात श्रीमंत क्रीडा संघटना धावली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाला किमान ५ कोटी रुपयांची रक्कम द्यायला हवी, असं बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी म्हणलं आहे. या मागणीचं पत्र त्यांनी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पाठवलं आहे. तसंच राज्यांच्या क्रिकेट संघटना आणि आयपीएल टीमनाही मदतीचं आवाहन सी.के.खन्ना यांनी स्वतःच्या अधिकारात केलं आहे.


इराणी करंडक स्पर्धेतल्या बक्षिसाची २५ लाखांची रक्कम विदर्भ क्रिकेट संघानं यापूर्वीच शहिदांच्या कुटुंबीयांना देऊ केली आहे. दुसरीकडे माजी कसोटीपटू विरेंद्र सेहवागने आपल्या शाळेमध्ये शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल, असं जाहीर केलं आहे.