संथ फलंदाजीचं खापर धोनीने कोणावर फोडलं? म्हणाला...
धोनीने कालच्या सामन्यात फार हळू फलंदाजी केली. यामुळे पराभवाला तो जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.
दुबई : काल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्लस विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दरम्यान चेन्नईच्या पराभवामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. धोनीने कालच्या सामन्यात फार हळू फलंदाजी केली. यामुळे पराभवाला तो जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने फार हळू फलंदाजी केली. यावेळी त्याने 27 चेंडूत फक्त 18 धावा केल्या. त्याने या डावात एक चौकार किंवा षटकार मारला नाही. अवेश खानच्या बॉलिंवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने कॅच घेत त्याला बाद केले. त्याच्या या फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.
सामन्यानंतर धोनीने फलंदाजीवर स्पष्टीकरण देत म्हटलं की, "या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपं नव्हतं. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप कठीण होती, आम्हाला 150रन्सच्या जवळ जायचं होतं. आमची धावसंख्या 150 झाली असती तर सामना मजेदार झाला असता. संथ खेळपट्टीमुळे आम्हाला अपेक्षेप्रमाणे धावसंख्या गाठता आली नाही.
धोनी पुढे म्हणाला, 'दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनाही फलंदाजीत अडचणी आल्या.'
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजी दिली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने अंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकामुळे 5 बाद 136 धावा केल्या आणि दिल्लीला 137 धावांचं लक्ष्य दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 19.4 षटकांत 7 विकेट गमावत 139 धावा करत सामना जिंकला.