दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनची विक्रमाला गवसणी!
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं विक्रमाला गवसणी घातली आहे.
सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं विक्रमाला गवसणी घातली आहे. डेल स्टेन हा आता दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा बॉलर झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली मॅच सुरु झाली आहे. या टेस्ट मॅचमध्ये ४२२वी विकेट घेताच स्टेननं हा विक्रम केला. याआधी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर शेन पोलॉकच्या नावावर हा रेकॉर्ड होता. पाकिस्तानचा ओपनर फकर जमानची विकेट घेतल्यानंतर डेल स्टेननं हा टप्पा गाठला.
३५ वर्षांच्या डेस स्टेननं मागच्या ३ वर्षांमध्ये फक्त ६ टेस्ट खेळल्या आहेत. दुखापतींमुळे स्टेनला मागच्या ३ वर्षांमध्ये फारसं क्रिकेट खेळता आलं नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीमध्ये डेल स्टेन ११व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली ४३१ विकेटसह १०व्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ८०० विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये शेन वॉर्न(७०८), अनिल कुंबळे(६१९), जेम्स अंडरसन (५६५), ग्लेन मॅकग्राथ(५६३), कोर्टनी वॉल्श (५१९), कपिल देव (४३४), रंगना हेराथ(४३३), स्टुअर्ट ब्रॉड(४३३), रिचर्ड हेडली(४३१) यांचा समावेश आहे.
दुखापतींमुळे मिळालेल्या विश्रांतीचा मला फायदा झाला. या काळामध्ये मी कुटुंबासोबत वेळ घालवला, आणि त्यांच्या आणखी जवळ आलो. तसंच मला फिरायलाही मिळालं. आता मला २३ वर्षांचा असल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया डेल स्टेननं ही मॅच सुरू होण्यापूर्वी दिली.