माजी क्रिकेटर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयने गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्ती केली असून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने त्याचं कौतुक केलं आहे. त्याचा आक्रमकपणा आणि मैदानातील सामन्याप्रती असणारी जागरुकता भारतीय संघाला फायदेशीर ठरेल असं डेल स्टेन म्हणाला आहे. भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर लगेचच गौतम गंभीरची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी गौतम गंभीरचा खूप मोठा चाहता आहे. मला त्याचं आक्रमकपणा फार आवडतो. तो काही मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी आहे, जो तुमच्याकडे फिरुन येतो आणि मला ते आवडतं. मला वाटतं की तो हाच आक्रमकपणा विराट आणि इतर काही वरिष्ठ खेळाडूंसह ड्रेसिंग रुममध्ये घेऊन जाईल जे कदाचित यापुढे मोठी भूमिका बजावणार नाहीत. मलाही याबाबत खात्री नाही", असं डेल स्टेन स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हणाला. 


"फक्त भारतच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये आपल्याला थोड्या आक्रमक खेळाडूंची गरज आहे, जे थोडं जास्त आक्रमकपणे खेळतील. आपण सर्वजण लीगमध्ये एकमेकांविरोधात खेळत असतो. यामुळे आपल्यात मैत्री होते. मला तो मैदानात ज्याप्रकारे आक्रमक असतो, ते आवडतं. मैदानाबाहेर मात्र तो जेंटलमन असतो. तो फार हुशार क्रिकेटपटू आहे. त्याची बुद्धी क्रिकेटच्या बाबतीत तल्लख आहे. त्या बाजूने विचार करायचा गेल्यास भारतीय संघासाठी तो उत्तम आहे," असंही डेल स्टेन म्हणाला आहे.


दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस यानेही गौतम गंभीरच्या कौशल्यावर विश्वास दर्शवला आहे. आपल्या आक्रमक स्वभावाने तो प्रशिक्षकपदाचं कर्तव्य योग्य पार पडेल असं तो म्हणाला आहे. "गौतमला प्रशिक्षकपदावर पाहणं चांगली बाब आहे. त्याच्याकडे क्रिकेटच्या बाबतीत चांगली हुशारी आहे. तो संघात आक्रमकपणा आणेल, कारण त्याला स्वत:लाच तसं खेळायला आवडतं. तो संघातील उणीव भरुन काढेल. भारतीय खेळाडूंना त्याच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल. त्याला भारतीय संघात अनके नव्या गोष्टी करण्याची संधी आहे. माझ्याकडून त्याला शुभेच्छा आहेत. आमच्याविरोधात खेळताना या शुभेच्छा नसतील. पण तो चांगलं काम करेल याची खात्री आहे," असं जॅक कॅलिस म्हणाला आहे.


पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीने "मला वाटतं ही मोठी संधी आहे. तो आता या संधीचं सोनं कसं करतो हे पाहावं लागणार आहे. मी त्याच्या मुलाखती पाहिल्या आहेत. तो सकारात्मक आणि स्पष्टपणे बोलतो," असं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.