भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत दोन्हीही खेळाडूंशी चर्चा करत आहे. सध्या तरी दोघेही आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार नाहीत असं चित्र दिसत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने विराट कोहली 2031 चाही एकदिवसीय वर्ल्डकप खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने मागच्याच महिन्यात वयाची 35 वर्षं पूर्ण केली आहेत. जर विराट कोहली 2031 च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसला तर त्यावेळी त्याचं वय 43 असेल. डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधताना आगामी वर्ल्डकपवर मत मांडलं. एका चाहत्याने डेव्हिड वॉर्नरकडे 2027 चा वर्ल्डकप खेळण्याची विनंती केली. यावेळी डेव्हिड वॉर्नरनेही उपहासात्मकपणे आपण 2031 पर्यंत खेळू असं म्हटलं. 


"सर तुम्ही 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? मला तुम्हाला वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहायचं आहे," असं एका चाहत्याने म्हटलं. त्यावर डेव्हिड वॉर्नरने इमोजी शेअर करत 2031 असं उत्तर दिलं. 


या चर्चेदरम्यान एका चाहत्याने आपली विराट कोहलीला 2031 चा वर्ल्डकपही खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी वॉर्नरने विराट कोहलीचं क्रिकेटवरील प्रेम आणि फिटनेसचं कौतुक करत तो न खेळण्याचं कारणच नाही असं म्हटलं आहे. "तो न खेळण्याचं काही कारण दिसत नाही. तो फिट आहे आणि खेळावर प्रचंड प्रेम करतो," असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला. 



विराट कोहलीप्रमाणे डेव्हिड वॉर्नरचंही टी-20 भवितव्य सध्या अनिश्चित आहे. पुढील महिन्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्याची त्याची इच्छा आहे. तसंच एकदिवसीय क्रिकेट अजून खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. 


"प्रत्येकाला स्वतःसाठी एक वास्तववादी ध्येय ठरवायचं आहे. माझं ध्येय अजूनही कॅरिबियनमध्ये (पुढच्या वर्षी जूनमध्ये) ट्वेंटी-20 विश्वचषक खेळण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे आणि मला वाटते त्यानंतरच मी एकदिवसीय क्रिकेटमधील माझ्या भवितव्याचा निर्णय घेऊ शकतो,” असं वॉर्नरने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन मीडियाला सांगितले.


"मला अद्यापही फिट असल्याचं जाणवत आहे. जे मी करतो त्यात मला सुसह्य वाटत आहे. त्यामुळे मला शांत बसून जे आहे त्यावर आणि काय खेळू शकतो यावर विचार करावा लागणार आहे," असंही वॉर्नर म्हणाला होता. 


"मी निश्चितच करार करणार नाही. ऑस्ट्रेलियामधील प्रणालीनुसार तुम्ही पाच (T20) सामने किंवा एकदिवसीय किंवा तीन कसोटी खेळल्यास, तुम्ही अपग्रेड होता त्यानंतर करार प्रणालीद्वारे कायदेशीररित्या बांधील होता," असं तो म्हणाला.