Dhoni-Kohli Daughters: विराट, धोनीच्या मुलींसंदर्भातील प्रकरण थेट दिल्ली पोलिसांत; जाणून घ्या नेमकं घडलं काय
Virat Kohli MS Dhoni Daughters: दिल्लीमधील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी दाखल करुन घेतली एफआयआर
Virat Kohli MS Dhoni Daughters: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या मुलींवर अश्लील भाषेत टीका करणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई करताना सोशल मीडियावरील युझर्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही कारवाई दिल्ली कमिशन ऑफ वुमन्स म्हणजेच दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. स्वाति मालीवाल यांनी या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यांच्या याच तक्रारीच्या आदारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मालीवाल यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मालीवाल यांनी स्वत: या एफआयआरची प्रत ट्विटरवर अपलोड केली आहे. "माझ्या नोटीसनंतर दिल्ली पोलिसांना कारवाई केली आहे. विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या मुलींबद्दल अश्लील भाषेत प्रतिक्रिया देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लवकरच सर्व दोषींना अटक करुन तुरुंगात टाकलं जाईल," असं मालीवाल यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये मालीवाल यांनी कोहली आणि धोनीला टॅगही केलं आहे.
विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांनी या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. दिल्ली माहिला आयोगाच्या तक्रारीच्या आदारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोशल मीडियावर विराटने केलेल्या पोस्टवर त्याची मुलगी वमिका आणि धोनीच्या पोस्टवर त्याची मुलगी जीवाबद्दल काही युझर्सने अश्लील भाषेत प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.
स्वाति मालीवाल यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा, धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत प्रतिक्रिया नोंदवणाऱ्यांना काही प्रश्न विचारले होते. या छोट्या मुलींबद्दलही अश्लील कमेंट लोकांनी केल्या आहेत असं म्हणताना संताप व्यक्त करत मालीवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या अश्लील प्रतिक्रियांचे स्क्रीन शॉटही मालीवाल यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले होते.
मालीवाल याच तक्रारीनंतर पोलिसांना गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.