ढाका : पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे जिथे त्यांना 19 नोव्हेंबरपासून 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापूर्वी सराव सत्रादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या एका हालचालीने मोठा गोंधळ उडाला आहे. यावेळी सराव सत्रादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघाने मीरपूरच्या मैदानावर आपल्या देशाचा झेंडा लावला होता. आणि या गोष्टीवरून वाद निर्माण झाला. 


पाकिस्तानचा झेंडा लावण्यावरून मोठा गदारोळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारलं की, अनेक देश बांग्लादेशात येतात आणि अनेक सामने खेळतात, परंतु सराव सत्रात कोणत्याही देशाने आपल्या देशाचा झेंडा उंचावला नाही. पाकिस्तानी क्रिकेट संघाने असं का केलं? त्यांना काय सिद्ध करायचे आहे?


पाकिस्तानी संघ होतोय ट्रोल


या घटनेनंतर पाकिस्तानी संघाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात येतंय. इतकंच नाही तर सराव सत्रादरम्यान त्यांना झेंडे हटवण्यास सांगण्यात आलं होतं. त्याच वेळी, काही युजर्सने याला लज्जास्पद म्हटलं आहे. ही मालिका रद्द करण्याची आणि अशा हालचालींवर बंदी घालण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून ते संघाच्या सरावाच्या वेळी मैदानात देशाचा ध्वज फडकवत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


या दौऱ्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. 2 सामन्यांची कसोटी मालिका 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.