जोहान्सबर्ग : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले. पण मागच्या काही काळापासून धोनी माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. धोनीनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी मागणी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी केली होती. टीका होत असली तरी विकेट मागून धोनीचे सल्ले भारताच्या विजयात महत्त्वाचे ठरत आहेत. धोनीच्या या सल्ल्यांचं कौतुक होत असतानाच तो अनेक रेकॉर्डही मोडत आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मॅचमध्येही धोनीनं नवा विक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेजा हेन्ड्रिक्सचा कॅच धोनीनं घेतला आणि टी-20मध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर झाला आहे. धोनीनं त्याच्या २७५व्या टी-20मध्ये भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर हेन्ड्रिक्सला त्याची १३४वी शिकार बनवली. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २५४ मॅचमध्ये १३३ कॅच घेतले होते. या यादीमध्ये दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं टी-20 क्रिकेटमध्ये १२३ कॅच घेतले आहेत.


क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक कॅच पकडणाऱ्यांच्या यादीमध्ये धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या पुढे आता फक्त मार्क बाऊचर आणि ऍडम गिलख्रिस्ट हेच विकेट कीपर आहेत.


पहिल्या टी-20मध्ये भारताचा विजय


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला. भारतानं ठेवलेल्या २०४ रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १७५ रन्सपर्यंत मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं ५ विकेट्स घेतल्या तर जयदेव उनाडकट, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेच्या रिझा हेंड्रिक्सनं सर्वाधिक ७० रन्स केल्या. भुवनेश्वर कुमारनं ४ ओव्हरमध्ये २४ रन्स देऊन ५ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारची टी-20 क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या विजयाबरोबच भारतानं ३ टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.


या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतानं २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २०३ रन्सचा डोंगर उभारला. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं फटकेबाजी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा ९ बॉल्समध्ये २१ रन्स करुन आऊट झाला. तर धवननं ३९ बॉल्समध्ये ७२ रन्स केल्या.


भारतीय टीममध्ये कमबॅक करणाऱ्या सुरेश रैनाला ७ बॉल्समध्ये १५ रन्स करण्यात आले. विराट कोहली २६ रन्सवर आणि धोनी १६ रन्सवर आऊट झाला. मनिष पांडे २९ रन्सवर आणि हार्दिक पांड्या १३ रन्सवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर डालानं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर क्रिस मॉरिस, तरबेज शम्सी आणि पेहलुक्वायोला प्रत्येकी १ विकेट मिळाली.