सचिननंतर आता धोनीच्या जर्सीचीही निवृत्ती
टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनलमध्ये पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चेला उधाण आले होते.
मुंबई : टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनलमध्ये पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चेला उधाण आले होते. पण धोनी निवृत्ती घेण्याबद्दल अजून तयार नाही. धोनीने जरी निवृत्ती घेतली नसली तरी आता त्याच्या जर्सीला अनौपचारिक रित्या निवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूच्या जर्सीवर नाव आणि नंबर नसायचे. पण आता टेस्ट क्रिकेटमध्येही खेळाडूच्या जर्सीवर नाव आणि नंबर येणार आहेत. या निर्णयामुळे खेळाडूची ओळख पटायला मदत होत आहे. धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच आता टेस्टमध्ये जर्सीवर खेळाडूचे नाव आणि नंबर दिसणार असल्याने धोनीची जर्सीदेखील अनौपचारिकरित्या निवृत्त होणार आहे.
धोनी वनडे आणि टी-२० मध्ये खेळताना त्याचा जर्सी नंबर ७ आहे. पण धोनी टेस्टमधून निवृत्त झाल्याने तो ७ नंबर कोणत्या खेळाडूला मिळेल याबद्दल चर्चा पाहायला मिळत होती. पण बीसीसीआयने ७ नंबरची जर्सी निवृत्त करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय आणि टीम इंडियाने टीममधील माजी खेळाडूंप्रती नेहमीच आदरभाव दाखवला आहे. विशिष्ट नंबरची जर्सी निवृत्त करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सचिनने निवृत्ती घोषित केल्यानंतर १० नंबरची जर्सी कोणत्याच खेळाडूला देण्यात आली नव्हती. भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर याने १० नंबरची जर्सी वापरली होती, पण यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं. अखेर १० नंबरची जर्सी यापुढे कोणताही खेळाडू वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
वनडे आणि टी-२० मध्ये खेळाडू जो नंबर वापरतात तोच नंबर टेस्टमध्ये कायम राहील अशी स्पष्टोक्ती बीसीसीआयकडून देण्यात आली.