अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?
भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव झाल्याचे मत काही क्रिडाप्रेमींनी व्यक्त केलं आहे. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला २८९ धावांच आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताची निराशाजनक सुरुवात झाली. धवन, अंबाती रायडू आणि कर्णधार कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर सर्व धुरा सलामीवीर रोहित शर्मा आणि धोनी या दोघांनी आपल्या खांदयावर घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताच्या विजयाच्या आशा वा़ढल्या होत्या. पण ३३ व्या ओव्हरमध्ये विजयाच्या आशा धुसर झाल्या.
५१ रन्सवर खेळत असताना, ३३ व्या ओव्हरमध्ये बेहरनड्राफच्या गोलंदाजीवर त्याने धोनीला चकवा देत एलबीडबल्यू असल्याची अपील केली. या अपिलला अंपायरने सकरात्मक प्रतिसाद देत धोनीला बाद घोषित केले. भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही. अंपायरचा निर्णय चुकीचा असून देखील धोनीला तंबूत परतावे लागले. जेव्हा धोनीला बाद झाल्याच्या निर्णयाचा रिप्ले पाहण्यात आला, त्यात तो नॉट आउट असल्याचे समोर आले. ज्या बॉलवर धोनी बाद असल्याचे निर्णय देण्यात आला, तो बॉल स्टंपच्या लाईनीत नसल्याचे निदर्शनास आले.
धोनी आऊट झाल्यानंतर भारताचे विकेट पडत गेले. खेळपट्टीवर कदाचित धोनी असता तर, त्याने भारताला विजयी सलामी मिळवून दिली असती, अशी आशा या निमित्ताने काही क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.