धोनी करणार खास रेकॉर्ड, सचिन आहे सगळ्यात पुढे
भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टी-२० मॅच शुक्रवारी कार्डिफमध्ये होणार आहे.
कार्डिफ : भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टी-२० मॅच शुक्रवारी कार्डिफमध्ये होणार आहे. पहिली मॅच जिंकल्यामुळे दुसरी टी-२० मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. याच मॅचमध्ये भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीच्या नावावर नवीन रेकॉर्ड होणार आहे. ही मॅच धोनीची ५००वी आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे. एवढ्या आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा धोनी हा तिसरा भारतीय ठरेल. याआधी सचिन आणि राहुल द्रविडनं ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत.
सचिन तेंडुलकरनं ६६३ आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. सचिननंतर जयवर्धनेनं ६५२ मॅच, कुमार संगकारानं ५९४ मॅच, सनथ जयसूर्यानं ५८६ मॅच, रिकी पाँटिंगनं ५६० मॅच आणि दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलीसनं ५१६ मॅच खेळल्या. तर राहुल द्रविडनं ५०९ आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या.
धोनीनं आत्तापर्यंत ४९९ मॅच खेळल्या आहेत. २००४ साली धोनीनं बांगलादेशविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं. तर २००५ साली धोनीनं श्रीलंकेविरुद्ध पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच खेळली. २०१४ साली धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये धोनी खेळत आहे.
धोनीनं त्याच्या कारकिर्दीमध्ये ९० टेस्ट मॅचच्या १४४ इनिंगमध्ये ३८.०९ च्या सरासरीनं ४,८७६ रन केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्या नावावर २५६ कॅच आणि ३८ स्टम्पिंग आहेत. धोनीनं ३१८ वनडेमध्ये ९,९६७ रन केल्या आहेत. यामध्ये १० शतक आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. ९१ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये धोनीन १४५५ रन केल्या आहेत. यातल्या ३९ वेळा धोनी नाबाद राहिला.
धोनीच्या नेतृत्वात भारतानं २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप, २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०१७ साली धोनीनं वनडे आणि टी-२०चं कर्णधारपद सोडलं.