मुंबई : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण कर्णधार विराट कोहलीच्या सांगण्यावरून धोनीने त्याच्या निवृत्तीचा निर्णय लांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्ल्ड कप सुरु असतानाच धोनीने काही खेळाडूंना त्याच्या निवृत्त व्हायच्या निर्णयाविषयी सांगितलं होतं. तसंच निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही धोनीशी त्याच्या भविष्यातील रणनितीवर चर्चा केली होती. एमएसके प्रसाद आणि धोनी यांच्यात रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीम निवडीच्या आधी बोलणं झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत हा पहिल्या पसंतीचा विकेट कीपर असणार आहे, असं धोनीला थेट सांगितलं. पण एमएसके प्रसाद यांनी धोनीवर निवृत्तीसाठी कोणताही दबाव टाकला नाही.


'विराटच्या सल्ल्यानंतर धोनीने तात्काळ निवृत्ती घ्यायचा निर्णय मागे घेतला,' असं विराटच्या जवळ असणाऱ्या सूत्राने सांगितलं आहे. धोनीच्या फिटनेसची काहीही अडचण नाही. टीमला गरज पडली तर पुढच्या टी-२० वर्ल्ड कप पर्यंत तो सहज खेळू शकतो. ऋषभ पंतला तयार करत असताना टीमला दुसऱ्या कोणत्याही विकेट कीपरची गरज नाही. जर पंतला दुखापत झाली किंवा त्याचा फॉर्म ढासळला तर धोनी सहज टीममध्ये येऊ शकतो', असं या सूत्राने सांगितलं.


वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया तीन विकेट कीपर घेऊन खेळली होती. पण आता दिनेश कार्तिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे २४ वर्षांचा संजू सॅमसन आणि २१ वर्षांचा इशान किशन तसंच टेस्टचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा पंतसोबतच्या दुसरा विकेट कीपरच्या रेसमध्ये आहेत.


'हे सगळे विकेट कीपर धोनीच्या अनुभवाची जागा घेऊ शकणार नाहीत. विराट नेहमीच धोनीचं मार्गदर्शन घेतो, त्यामुळे धोनी आणखी काही काळ टीमसोबत असावा, असं कोहलीला वाटतं आहे,' अशी माहिती सूत्राने दिली.


पुढच्या आयपीएलमध्ये धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे हे निश्चित आहे. आयपीएलनंतर ४ महिन्यांमध्येच टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत धोनी त्याची सेवा देऊ शकतो, असं भारतीय टीम प्रशासनाला वाटत आहे.


पुढचे २ महिने धोनीने विश्रांती मागितली आहे, त्यामुळे त्याचं ग्रेड ए कॉन्ट्रॅक्ट धोक्यात आलं आहे. वर्ल्ड कपदरम्यान बोटाला दुखापत झाल्यामुळे धोनीने विश्रांती मागितली आहे. पण फिट झाल्यानंतरही धोनीने विश्रांती मागितली तर मात्र धोनीचं ग्रेड ए कॉन्ट्रॅक्ट धोक्यात येईल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. हे कॉन्ट्रॅक्ट मार्च २०२० मध्ये संपणार आहे.