Dinesh Karthik on Rohit Sharma: श्रीलंका आणि न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही मालिकेत भारताने 3-0 व्हाईटवॉश देत आयसीसी क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल स्थान पटकावलं आहे. दरम्यान टी-20 मध्ये मात्र हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, हार्दिकने श्रीलंकेविरोधातील मालिका जिंकत आपण एक उत्तम कर्णधार असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र असं असतानाही संघ व्यवस्थापनाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये वेगळे कर्णधार ठेवण्यासंबंधी अद्याप निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो यावर हा निर्णय अवलंबून असेल असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जर तशी काही परिस्थिती असेल तर यावर नक्की चर्चा झाली पाहिजे. पण सध्या यावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. याची दोन कारणं आहेत. 2023 वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघ फक्त तीन टी-20 खेळणार आहे. आयपीएलनंतर संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. त्यानंतरच संघ नेमका कुठे आहे याची कल्पना येईल," असं कार्तिकने सांगितलं आहे.


"जर रोहित शर्माच्या संघाने मैदानात काही विशेष कामगिरी केली नाही, तर कर्णधारपद विभागलं जाऊ शकतं. मला वाटतं योग्यवेळी ही संधी प्राप्त होईल. पण जर रोहितने चांगली कामगिरी करत यश मिळवलं तर मात्र आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. तसंच त्याची इच्छा असेल तर 2024 वर्ल्डकपची जबाबदारीही देऊ शकतो," असं कार्तिकने म्हटलं आहे. 


दिनेश कार्तिकने हार्दिक पांड्याचं कौतुक केलं असून श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. "हार्दिकने जबरदस्त कामगिरी केल्याचं मी मानतो. दव असतानाही श्रीलंकेला 160 धावांवर रोखणं हा उत्तम प्रयत्न होता. त्याने आपण कर्णधार म्हणून योग्य असल्याचं सिद्ध केलं आहे," असं कार्तिकने सांगितलं.


हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेतही संघाचं नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने 21 धावांनी भारताचा पराभव केला असून आघाडी घेतली आहे.