Gautam Gambhir Slams Former Cricketers: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केलेल्या एका विधानमुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशाचे दोन माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग हे दोघेही पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम करतात. आयपीएलदरम्यान या दोघांच्या जाहिराती चांगल्याच चर्चेत होत्या. तसेच 1983 साली भारताला पहिल्यादा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देवही पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम करताना दिसतात. याच मुद्द्यावरुन गंभीरने या क्रिकेटपटूंना लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे यापैकी सेहवागबरोबर गंभीर स्वत: ओपनिंगला उतरायचा. असं असतानाही आता गंभीरने सेहवागवर निशाणा साधला आहे.


नाव नाही काम महत्त्वाचं म्हणत लगावला टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीरने थेट कोणत्याही क्रिकेटपटूचा उल्लेख केला नाही. मात्र पान मसल्याची जाहिरात क्रिकेटपटूंनी करणं फारच लज्जास्पद असल्याचं गंभीरने म्हटलं आहे. गंभीरने 'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली परखड मतं मांडली. गंभीरला पान मसाल्याची जाहिरात करण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने अशा जाहिराती करणे फार लज्जास्पद आणि निराशाजनक आहे, असं म्हटलं. "लज्जास्पद आणि निराशाजनक एवढ्या 2 शब्दांमध्येच ही याचं वर्णन करेन. मी माझ्या आयुष्यात कधीही असा विचार केला नव्हता की एखादा खेळाडू पान मसाल्याची जाहिरात करेल. मी वारंवार एकच गोष्ट सांगतो आणि यापुढेही सांगत राहील की आपला आदर्श निवडताना अनेकदा विचार करा. नाव महत्त्वाचं नसतं तर त्याचं काम महत्त्वाचं असतं," असा टोला गंभीरने कोणाचंही नाव न घेता लगावला.


पैशांवरुन सुनावलं


"तुम्ही कोणीही असलात तरी तुमच्या नावाने ओळखले जात नाही. तुम्ही तुमच्या कामांनी म्हणजेच कर्माने ओळखले जाता. अनेक कोटी तरुण तुम्हाला पाहत आहेत. पैशासाठी एखाद्या पान मसाल्याची जाहिरात करण्याइतका पैसा महत्त्वाचा नाही. पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी इतर बऱ्याच गोष्टी करता येतील. तुम्ही थोडा पैसा सोडलाही पाहिजे कारण तुम्ही तरुणांचे आदर्श आहात. त्यामुळेच थोडा पैसा सोडण्याची हिंमत तुम्ही दाखवायला हवी," असं गंभीर म्हणाला.


मी 3 कोटी रुपये सोडले


गौतम गंभीरने 2018 चं आयपीएलचं पर्व सुरु असतानाच गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद सोडलं होतं. त्याने या पर्वासाठी संघ व्यवस्थापनाकडून मानधन घेतलं नव्हतं. "मी 2018 मध्ये जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधार पद सोडलं तेव्हा 3 कोटींवर पाणी सोडलं होतं. मी ते 3 कोटी घेऊ शकलो अशतो. मात्र मी ते सोडले. कारण मी नेहमी यावर विश्वास ठेवतो की जे मिळवण्याची माझी क्षमता आहे तेच मला मिळालं पाहिजे," असंही गंभीर म्हणाला.