IND vs SA: टीम इंडियाच्या सक्सेसचा `विराट` मंत्र तुम्हाला माहितीये का?
गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने एक कल्पना सुचवलीये ज्याची सगळीकडे चर्चा होतेय.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना केपटाऊनमध्ये खेळला जातोय. दरम्यान हा सामना सद्य स्थितीला दोन्ही टीमच्या हातात आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाहीये. अशा परिस्थितीत फक्त खेळाडूच मैदानात आहेत. त्यामुळे गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने एक कल्पना सुचवलीये ज्याची सगळीकडे चर्चा होतेय.
सध्या सोशल मीडियावर केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ड्रेसिंग रूममध्ये बसलेले टीम इंडियाचे खेळाडू टाळ्या वाजवताना दिसतायत.
तिसरी कसोटी निर्णायक असून भारताला ही जिंकायची आहे. यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी कर्णधार कोहलीने ही कल्पना सुचवली होती. याचा चांगला परिणाम टीम इंडियाच्या गोलंदाजांवर दिसून आला. गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 रन्समध्ये गुंडाळला.
कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या प्रत्येक खेळाडूला टाळ्या वाजवण्यास सांगितलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यानुसार मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा आणि जयंत यादव डगआऊटमध्ये बसले होते. यावेळी कोहलीचा इशारा मिळताच ते जोरात टाळ्या वाजवू लागले. त्याचवेळी मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराही मैदानावर टाळ्या वाजवताना दिसले.
कधीकधी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळाडूंना मोटीवेट करणं कठीण असतं. याचा उल्लेख खुद्द विराट कोहलीने अनेकदा केला आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह ही जोडी पहिल्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना विराट कोहली खेळाडूंना, सतत टाळ्या वाजवत राहा, असं सांगत होता.