अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा वेग तुम्हाला माहित आहे का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली. यापूर्वी त्याने १४ व १६ वर्षांखालील गटातही चांगली कामगिरी केली आहे. सचिनने फलंदाजीमध्ये आपले नाव कमावले आहे. मात्र, अर्जुन गोलंदाज म्हणून अधिक प्रभावी ठरताना दिसतोय.
अर्जुन तेंडुलकर गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये जलदगती गोलंदाजीचे धडे घेत होता. इंग्लंडमध्ये जलदगती गोलंदाजीचा सराव करत असताना अर्जुनने इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोला भन्नाट यॉर्कर टाकला होता. या चेंडूमुळे बेअरस्टोच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळेस अर्जुन चांगलाच चर्चेत आला.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषकावेळी भारतीय महिला संघातील खेळाडूंनी अर्जुनच्या गोलंदाजीवर नेट प्रॅक्टिस केली होती. यावेळी त्याने १३० प्रतिताशी किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली होती. वयाच्या १७ व्या वर्षी अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग पाहून भारतीय महिला संघातील खेळाडू आणि अनेकांना चकीत करणारा आहे.