मुंबई: इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर मैदानात खेळायला उतरला होता खरा पण दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा त्याला घरी बसण्याची वेळ आली आहे. जोफ्राच्या हाताची दुखापत पुन्हा एकदा सुरू झाल्याने त्याला आता खेळता येणार नाही. त्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड क्रिकेट बोर्डनं दिलेल्या माहितीनुसार 2 जूनपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिज होण्यापूर्वीच जोफ्रा आर्चर संघातून बाहेर गेला आहे. काउंटी चॅम्पियन्समध्ये खेळल्यानंतर जोफ्रा आर्चला झालेली जुनी दुखापत पुन्हा एकदा त्रास देत आहे. 



जोफ्रा आर्चनं मैदानात दमदार वापसी करत दोन महत्त्वाच्या विकेट्स 29 रन देऊन घेतल्या होत्या. त्यानंतर जोफ्राच्या हाताला सूज येऊ लागली. कोपराला सूज आल्यामुळे तो पुढे गोलंदाजी करू शकला नाही. सर्व खेळाडू तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 


आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करून काच बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतर जोफ्रा रिकव्हर झाला आणि मैदानात उतरला मात्र हाताला सूज येऊ लागल्यानं तो आता पुन्हा आराम करणार आहे. 


न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये जोफ्रा खेळणार नाही. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज होणार आहे. या सामन्यात जोफ्रा खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही.