मुंबई : क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण अनेक हॅट्रिक पाहल्या असतील पण तिन्ही दिग्गज बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा पराक्रम क्वचितच होतो. असाच विक्रम इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये झाला आहे. रविवारी यॉर्कशायर आणि लँकशायरमध्ये रोजेस काऊंटी चॅम्पियनशीपच्या मॅचमध्ये अशीच हॅट्रिक झाली. लँकशायरचा बॉलर जॉर्डन क्लार्कनं इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि इंग्लंड टीमचा बॅट्समन जॉनी बेअरस्टोची लागोपाठ तीन बॉलवर विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वोत्तम हॅट्रिक असल्याचं बोललं जातंय. कारण एवढे दिग्गज बॅट्समन लागोपाठ आऊट होण्याची घटना याआधी घडली नव्हती. आऊट झालेले बॅट्समन आयसीसी टेस्ट क्रमवारीत तीन, चार आणि सोळाव्या क्रमांकावर आहेत. रूट, विलियमसन आणि बेअरस्टो या तिघांनी मिळून टेस्ट क्रिकेटमध्ये १४ हजार रन केल्या आहेत.


या मॅचमध्ये जो रूट १९ बॉलवर २२ रनवर खेळत होता. रुटनं क्लार्कला ३ फोर मारल्या होत्या. यानंतर क्लार्कनं रूटला एलबीडब्ल्यू केलं. यानंतर पुढच्याच बॉलवर क्लार्कनं केन विलियमसनलाही एलबीडब्ल्यू आऊट केलं. क्लार्कच्या तिसऱ्या बॉलवर जॉनी बेअरस्टोनं बाहेर असलेल्या बॉलला बॅट लावण्याचा प्रयत्न केला पण जॉस बटलरनं बेअरस्टोचा कॅच पकडून क्लार्कची हॅट्रिक पूर्ण केली.


तिन्ही बॅट्समन शानदार फॉर्ममध्ये


सध्या हे तिन्ही बॅट्समन शानदार फॉर्ममध्ये आहेत. जो रूटनं भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दोन शतकं केली आहेत. तर केन विलियमसननं आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. आयपीएलमध्ये या मोसमात सर्वाधिक रन बनवल्यामुळे केन विलियमसनला ऑरेंज कॅप मिळाली होती. वेस्ट इंडिजविरुद्धही केन विलियमसननं शानदार प्रदर्शन केलं होतं. जॉनी बेअरस्टोनं भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या खेळी केल्या होत्या.