T 20 World Cup 2021 | वर्ल्ड कपआधी स्टार ऑलराऊंडर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) आता अवघे काही दिवस बाकी आहेत.
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या क्रिकेटच्या महासंग्रमासाठी सर्व संघांनी खेळाडूंची नावंही जाहीर केली आहेत. मात्र आता इंग्लंड क्रिकेट टीमला (England Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करण (Sam Curran) हा दुखापतीमुळे या स्पर्धेबाहेर झाला आहे. सॅम आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळत होता. सॅम या दुखापतीनंतर आता इंग्लंडला परतणार आहे. (england cricket team all rounder Sam Curran ruled out to T 20 world cup 2021 due to lower back injury)
नक्की काय झालं?
शनिवारी चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात अबूधाबीत सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान सॅमला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. यानंतर आवश्यकत ते उपचार केल्यानंतर त्याला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. परिणामी सॅमला स्पर्धेबाहेर पडावं लागलं.
सॅमला दुखापत झाल्याने आता त्याचा भाऊ टॉम करणला (Tom Curran) संधी देण्यात आली आहे. तर रीस टॉपलीचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे."सॅम करण लवकरच इंग्लंडच्या दिशेने निघणार आहे. मेडिकल टीम या आठवड्याच्या शेवटी सॅमवर योग्य ते उपातर करतील. तसेच तो वैद्यकीय पथकाच्या नजरेखाली असणार आहे", अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
सॅमने या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एकूण 9 सामन्यांमध्ये चेन्नईचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्याने 9.93 च्या इकॉनॉमी रेटने 9 विकेट्स घेतल्या. तर 4 डावांमध्ये 56 धावा केल्या.
टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम
इयोन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, टॉम करण, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, टाइमल मिल्स, आदिल राशिद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रीस टॉपली आणि जेम्स विन्स.