T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपमधून स्टार खेळाडू तडकाफडकी बाहेर
स्टार खेळाडू दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2022) बाहेर पडला आहे.
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. क्रिकेट चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. हा खेळाडू भेदक बॉलिंगसाठी ओळखला जातो. (england reece topley ruled out t 20 world cup 2022 due to injurey)
इंग्लंडचा रीस टोपली (Reece Topley) दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आहे. रीस टोपलीच्या जागी टायमल मिल्सचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडला यासाठी आयसीसीच्या (ICC) समितीची मंजुरी मिळाली आहे.
नक्की काय झालं?
ब्रिस्बेन येथे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सराव सामन्यापूर्वी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाचा सराव करताना रीस टोपलीच्या घोट्याला दुखापत झाली. रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या सामन्यासाठी तो सज्ज होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याची दुखापत गंभीर असून राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या डावखुऱ्या मिल्सला मुख्य संघात स्थान मिळणार आहे.