केपटाऊन : दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सने पराभव करत सिरीज जिंकली. यापूर्वी 2-1 ने कसोटी सिरीजही जिंकली. मात्र आनंदात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी एक वाईट बातमी आली आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना दक्षिण आफ्रिकेच्या टीमने निर्धारित वेळेपेक्षा एक ओव्हर कमी टाकल्याचं आढळून आलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमला शिक्षा सुनावण्यात आली. आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.


"आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार, खेळाडूंनी सामन्यात त्यांच्या टीमच्या निर्धारित वेळेपेक्षा कमी ओव्हर टाकल्यास सामन्यातील फीच्या 20 टक्के दंड आकारण्यात येतो," असं आयसीसीच्या निवेदनात म्हटलंय.


निवेदनात पुढे म्हटलंय  की, "कॅप्टन टेम्बा बावुमाने चूक मान्य केली असून आणि दिलेला दंडही कबूल केला आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाही." मैदानावरील अंपायर मारायस इरास्मस आणि एड्रियन होल्डस्टॉक, थर्ड अंपायर अल्लाउद्दीन पालेकर आणि चौथे अंपायर बोंगानी जेले यांनी हे आरोप केलेत.


दोन्ही टीममधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळू शकते. मात्र, फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमविरुद्ध हे काम सोपं नसेल.