मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि कॉमेंट्रिटर मायकेल वॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियात 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅशेस कसोटी मालिकेसाठी मायकेल वॉनचेही कॉमेंट्रिटर टीममध्ये नाव आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मायकेल वॉनचा ऑस्ट्रेलिया दौरा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विट करून माहिती दिली की, "मला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मला ऑस्ट्रेलियाला जाणारी फ्लाईट पुढच्या आठवड्यापर्यंत ढकलावं लागलंय. हे खूपच निराशाजनक आहे. मात्र, या बहाण्याने मी ब्रिस्बेनमधील पाऊस टाळू शकेन."


मायकल वॉन अलीकडच्या काळात खूप वादात सापडला आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा वर्णद्वेषाचा वाद सुरू झाला, तेव्हा अजीम रफिकच्या आरोपानंतर मायकल वॉनवरही आरोप झाले होते. यानंतर मायकेल वॉनला बीबीसीच्या एका कार्यक्रमातून वगळण्यात आलं होतं.


अझीम रफिकने 2009मध्ये यॉर्कशायरकडून खेळताना मायकेल वॉनच्या नावासह आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप केला होता. मायकल वॉनने हे आरोप ठामपणे फेटाळले असले तरी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.   


ऑस्ट्रेलियात 8 डिसेंबरपासून अॅशेसला सुरुवात होतेय. पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे.