मुंबई : दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. क्रिकेट सामना म्हणू नका किंवा मग एखाद्या कलाकाराचा कलाविष्कार, इतकच नव्हे तर, एखादं सीसीटीव्ही फूटेजही अनपेक्षितपणे इतकं व्हायरल होतं ती विचारुन सोय नाही. व्हायरल व्हिडिओंच्या या गर्दीत आता चर्चा होतेय ती म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन २०१९ मधील एका व्हिडिओची. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एका सुरक्षा रक्षकाच्या कामाची प्रशंसा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये टेनिस विश्वातील लोकप्रिय आणि अग्रगणी खेळाडू रॉजर फेडरर याला चक्क लॉकर रुममध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता फेडररला प्रवेश नाकारण्याचं धाडस कोण करणार, असा प्रश्न जर तुमच्या मनात घर करत असेल तर त्याचं उत्तरही याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.



फेडररकडे लॉकर रुममध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारं ओळखपत्र नसल्यामुळेच त्याला लॉकरुममध्ये प्रवेश नाकारत ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान सुरक्षा रक्षकाने आपलं काम आणि जबाबदारी चोखपणे निभावली. सुरक्षा रक्षकाने अडवल्यानंतर फेडररही मोठ्या समंजसपणे ओळखपत्र दाखवून त्यानंतरच लॉकरुमध्ये जातो, हेसुद्धा व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 


कामाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या या सुरक्षा रक्षकाची सध्या अनेकांनीच प्रशंसा केली असून, खुद्द सचिनने त्याची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ ट्विट करत अशा प्रकारची वृत्ती आणि अशी माणसं हल्ली फार कमीच पाहायला मिळतात अशा आशयाची ओळ त्याने व्हिडिओ पोस्ट करत लिहिली. खिलाडू वृत्ती, समंजसपणा आणि समोरच्याच्या कामाप्रती असणारा आदर या गोष्टी हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने अधोरेखित करत आहे.