आशिया कपमधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील कँडी रुग्णालयात हा सामना खेळला जात आहे. दरम्यान, रोहित शर्माने दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करत असल्याचं जाहीर केलं. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर संघातून बाहेर आला. याशिवाय संघात मोहम्मद शामीचाही समावेश कऱण्यात आलेला नाही. मोहम्मद शामीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. संघात शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असे तीन गोलंदाज आहेत. शार्दूलला संघात घेत भारताने आणखी एक फलंदाज समाविष्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भारतीय संघाचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने मोहम्मद शमीला संघातून वगळण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली. संजय मांजरेकच्या मते, मोहम्मद शमी हा पाकिस्तान संघासाठी जास्त घातक ठरला असता. दुसरीकडे शार्दुल ठाकूरला संघात घेतल्याने भारताला फलंदाजीबाबत किती असुरक्षित वाटत आहे हे दिसत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 


"शार्दूल ठाकूरच्या तुलनेत मोहम्मद शमी पाकिस्तान संघासाठी जास्त घातक ठरला असता. तुम्ही फलंदाजीमधील खोलीचा विचार करता, पण गोलंदाजीकडे लक्ष दिलं पाहिजे. यातून भारतीय संघ फलंदाजीबाबत किती असुरक्षित आहे हे दिसतं," असं संजय मांजरेकरने टॉस झाल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशई बोलताना म्हटलं.


दरम्यान, भारतीय संघाने कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या दोन फिरकीपटूंना संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला आहे. 


भारतीय संघ: 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान संघ: 


फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ