`शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...`; `मीच क्रिकेटचा देव` म्हणत कोहली हे काय बोलला?
Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: या व्हिडीओमध्ये विराट शुभमनला पुढील विराट म्हणून संबोधलं जात याबद्दल बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: क्रिकेटच्या जगाला अफवा आणि अतिरंजित मथळे तसेच वादग्रस्त विधानं हे काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा मैदानातील कामगिरीपेक्षा हे वादच अधिक चर्चेत असतात. सध्या अशाच एका वादाला तोंड फुटलं आहे ते विराट कोहलीच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये या व्हिडीओमध्ये विराट कोहली भारताचा तरुण सलामीवीर शुभमन गिलवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे. विराट आणि शुभमनमध्ये काही बिनसलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकदा शुभमनची विराटशी तुलना केली जाते. मात्र शुभमनला विराट इतकं यशस्वी होणं शक्य नाही असा दावा स्वत: विराटच करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र या व्हिडीओसंदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये विराट मुलाखत देत असल्याचं दिसत आहे. विराटच्या आवाजामध्ये एक व्हॉइस ओव्हर ऐकू येतो. "मी ऑस्ट्रेलियामधून परत आल्यानंतर मला समजलं की उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं. मी गिलचा खेळ फार जवळून पाहतोय. त्याच्यामध्ये नक्कीच कौशल्य आहे पण आश्वासक खेळ करणं आणि लेजंड होणं यामध्ये मोठा फरक आहे," असं विराट म्हणताना दिसत आहे.
मीच क्रिकेटचा देव
"गिलचं खेळाचं तंत्र उत्तम आहे पण तो स्वत:च्या शैलीमधून कधीच बाहेर पडत नाही. लोक त्याच्याबद्दल बोलताना पुढचा विराट कोहली असं म्हणतात पण मात्र मी स्पष्टपणे सांगू शकतो की एकच विराट कोहली आहे. मी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या गोलंदाजांचा अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना केला आहे. मी हे मागील दशकभरापासून करतोय. काही खेळींमध्ये तुम्ही हे करुन दाखवू शकत नाही. मी चुकीचा निर्णय घेतला तर मी संघाबाहेर बसून दिवसभर टाळ्या वाजवत राहील. भारतीय क्रिकेटमध्ये कोणी देव असेल तर तो मी आहे. मी एक बेंचमार्क सेट केला आहे. तिथे पोहोचायला गिलला फार वेळ लागेल," असं विराटच्या आवाजामध्ये ऐकू येतं.
व्हिडीओचं सत्य काय?
विराट शुभमनवर करत असलेल्या टीकेचा हा व्हिडीओ डीफ-फेक व्हिडीओ आहे. म्हणजेच हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून डीप-फेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिप्सींगची मदत घेत तो तयार करण्यात आला आहे. विराट शुभमनबद्दल असं काही बोलला नाही. आर्टीफिशीएल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असले व्हिडीओ तयार करुन ते व्हायरल करण्याचा ट्रेण्ड हल्ली सर्रास पाहायला मिळतो.