जोहान्सबर्ग : फाफ डुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. फाफने टेस्ट आणि टी-२० टीमचं कर्णधारपद सोडल्याचं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. 'जेव्हा मी टीमची जबाबदारी सांभाळली, तेव्हा टीमची कामगिरी उत्कृष्ट व्हावी, यासाठी प्रयत्न केले. आता टीम नवीन नेतृत्वासोबत नव्या दिशेने जात आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडू आहेत. त्यामुळे कर्णधारपद सोडणं दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी योग्य आहे,' असं फाफ म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्विंटन डि कॉक सारख्या तरुण नेतृत्वासोबत टीमने पुढे जावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं फाफने सांगितलं. 'हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता, पण क्विंटन डि कॉक, मार्क बाऊचर आणि इतर सहकाऱ्यांना सहकार्य करण्यात मी कायमच तत्पर असेन, यामुळे टीम चांगला आकार घेईल', अशी प्रतिक्रिया फाफने दिली आहे. 


फाफने २०१२ सालापासून दक्षिण आफ्रिकेसाठी सगळ्या फॉरमॅटमध्ये एकूण १२१ आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये नेतृत्व केलं आहे. फाफला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मॅचसाठी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.