फॅप डुप्लेसिसची झुंजार खेळी, चेन्नई आयपीएलच्या फायनलमध्ये
फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादनं ठेवलेल्या १४० रनच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या नाकी नऊ आले होते. ५७ रनवरच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण फॅप डुप्लेसिसनं ४२ बॉलमध्ये नाबाद ६७ रन करून चेन्नईला विजय मिळवून दिला. डुप्लेसिसनं ५ फोर आणि ४ सिक्स लगावले. चेन्नईला शेवटच्या ओव्हरला विजयासाठी ६ रनची आवश्यकता होती आणि त्यांच्या ८ विकेट गेल्या होत्या. पण २०व्या ओव्हरच्या भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच बॉलला डुप्लेसिसनं शानदार सिक्स लगावत चेन्नईला जिंकवून दिलं. हैदराबादकडून संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि राशिद खानला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या तर भुवनेश्वर कुमारला १ विकेट मिळाली.
या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. चेन्नईच्या बॉलरनी हा निर्णय योग्य ठरवला. या मॅचच्या पहिल्याच बॉलला दीपक चहरनं शिखर धवनला बोल्ड केलं. स्कोअरबोर्डवर ६९ रन असतानाच हैदराबादचा निम्मा संघ आऊट झाला होता. पण सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कार्लोस ब्रॅथवेटनं २९ बॉलमध्ये ४३ रन केल्या. यामध्ये १ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.
चेन्नई फायनलमध्ये
दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईनं आयपीएलची फायनल गाठली आहे. २७ तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई फायनल खेळेल. आत्तापर्यंत दोन वेळा चेन्नईला आयपीएल जिंकण्यात यश आलं आहे. यंदा धोनीची टीम आयपीएल जिंकली तर रोहित शर्माच्या मुंबईच्या ३ वेळा आयपीएल जिंकण्याच्या रेकॉर्डशी ते बरोबरी करतील.
हैदराबादला अजून एक संधी
या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी हैदराबादला फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या २ क्रमांकावर राहिल्यास टीमना फायनल गाठण्यासाठी २ संधी दिल्या जातात. २७ तारखेला होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये हैदराबादचा विजय झाला तर ते पुन्हा चेन्नईविरुद्ध फायनल खेळतील. २७ तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलची फायनल होणार आहे.
कोलकाता-राजस्थानमध्ये एलिमिनेटर
कोलकाता आणि राजस्थानमध्ये मंगळवारी एलिमिनेटर मॅच होणार आहे. ईडन गार्डन मैदानात हा सामना रंगेल. या दोघांमधली जी टीम पराभूत होईल त्यांच आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर ज्या टीमचा विजय होईल ते क्वालिफायर-२ मध्ये हैदराबादविरुद्ध खेळतील. क्वालिफायर-२ मध्ये ज्या टीमचा विजय होईल ते चेन्नईविरुद्ध फायनल खेळतील. क्वालिफायर-२ चा सामना २५ मे रोजी ईडन गार्डन मैदानात होईल.