सनथ जयसूर्याबद्दलची `ती` बातमी खरी आहे का? अश्विनचा ट्विटरवर प्रश्न
सनथ जयसूर्याच्या मृत्यूची बातमी ऐकून भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन हैराण झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : सनथ जयसूर्याच्या मृत्यूची बातमी ऐकून भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन हैराण झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर सनथ जयसूर्याबद्दलची ती बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे. कॅनडामध्ये प्रवासादरम्यान सनथ जयसूर्याचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. यानंतर 'सनथ जयसूर्याबद्दलची ती बातमी खरी आहे का?' असा सवाल अश्विनने ट्विटरवर उपस्थित केला. पण थोड्याच वेळात ही बातमी खोटी असल्याचं अश्विनने ट्विटरवरुनच सांगितलं.
कॅनडामध्ये कारने एका व्यक्तीला धडक दिली. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं नाव सनथ जयसूर्या आहे. कॅनडामध्ये असलेल्या श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे, अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या खोट्या बातमीच्या जाळ्यात अभिनेता अर्शद वारसीही अडकला. अर्शद वारसीने ट्विटरवरून ही बातमी दु:खद आणि धक्कादायक असल्याचं ट्विट केलं. पण बातमी खोटी असल्याचं समजल्यावर 'देवाचे धन्यवाद, जग तुमच्यावर खूप प्रेम करतं,' असं ट्विट केलं.
खुद्द सनथ जयसूर्या यानेही ही बातमी फेटाळून लावली आहे. मागच्या कालावधीमध्ये मी कॅनडाला गेलो नाही. मी श्रीलंकेमध्ये सुखरूप आहे. माझ्याबद्दल चालवण्यात येणाऱ्या त्या बातमीकडे दुर्लक्ष करा. अफवांपासून लांब राहा, असं आवाहन जयसूर्याने केलं.
४९ वर्षांच्या जयसूर्याने ४४५ वनडे, ११० टेस्ट आणि ३१ टी-२० मॅच खेळल्या. वनडे क्रिकेटमध्ये त्याने १३ हजारांपेक्षा जास्त रन केले आणि ३२३ विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने ६,९७३ रन केले आणि ९८ विकेट घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयसूर्याला ६२९ रन आणि १९ विकेट घेता आल्या.