म्हणून पुढच्या वर्षीचं आयपीएल फिकं होणार?
भारतामध्ये सध्या टी-20 क्रिकेटचा रोमांच सुरू आहे.
मुंबई : भारतामध्ये सध्या टी-20 क्रिकेटचा रोमांच सुरू आहे. आयपीएलमध्ये जगातले तगडे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे सगळेच सामने चुरशीचे झाले. प्ले ऑफमध्ये कोणत्याच ४ टीम क्वालिफाय होणार हे देखील शेवटच्याच दिवशी कळलं. पुढच्या वर्षी मात्र आयपीएलमध्ये एवढा रोमांच बघायला मिळेल का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार का याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. पुढच्या वर्षी ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडू आयपीएलमधून काढता पाय घेण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपआधी खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून काही बोर्डांकडूनही खेळाडूंच्या सहभागावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. एवढच नाही तर भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली, धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन यांचा फिटनेस आणि सहभागाबद्दल बीसीसीआयला विचार करावा लागेल.
आयपीएल वेळापत्रकात बदल
आत्तापर्यंत प्रत्येकवर्षी आयपीएलची सुरुवात एप्रिलमध्ये होते तर शेवट मेमध्ये होतो. पुढच्या वर्षी मात्र आयपीएलच्या वेळापत्राकत बदल करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी आयपीएल २९ मार्च ते १९ मेपर्यंत होणार आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कप सुरु होत असल्यामुळे पुढच्या वर्षी आयपीएल लवकर होईल. सुरुवातीला भारत २ जूनला वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणार होता. पण लोढा समितीच्या नियमांनुसार आयपीएल मॅच आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १५ दिवसांचा कालावधी असणं बंधनकारक आहे. म्हणून ही मॅच आता ५ जूनला होणार आहे.
भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी
२०१५ वर्ल्ड कप आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. २०१९ वर्ल्ड कपमध्ये मात्र भारत पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेशी खेळेल.
१६ जूनला पाकिस्तानशी लढत
१६ जूनला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा एकदाही पराभव झालेला नाही. आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या ६ पैकी ६ मॅचमध्ये भारताचा विजय झालेला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी भारत मैदानात उतरेल. १९९२ साली झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम एकमेकांविरोधात खेळणार आहेत.
आयपीएल युएईमध्ये होणार?
पुढच्या वर्षी होणारं आयपीएल युएईमध्ये हलवण्यात येऊ शकतं. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला तर बीसीसीआयकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आलं होतं. तर २०१४ सालच्या निवडणुकींवेळी आयपीएलचा पहिला भाग युएईमध्ये आणि दुसरा भाग भारतात खेळवण्यात आला.